विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ गुणवंतांचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर - मनिषा कुलकर्णी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘शिवशाही महारत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय, दिशादर्शक आणि लोकहिताचे काम करणाऱ्या १६ व्यक्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शिवशाही महारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवारी या होत्या, तर सोहळ्याचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते झाले.
मंचावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या देखण्या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मंचावर प्रामुख्याने मंगेश चिवटे (विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालय) प्रशांत डगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर), डॉ. सुनिता पोटे (नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती, शिरूर नगरपालिका), ऋतुजा मोरे (माजी जिल्हा परिषद सदस्य), महेश साठे (शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख), डॉ. प्रणिता भालके (नगराध्यक्ष, पंढरपूर), दिलीप धोत्रे (मनसे नेते), सतीश सावंत (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ), बापूसाहेब अडसूळ (शिक्षक नेते), महबूब सय्यद (उपाध्यक्ष, मनसे पुणे जिल्हा), रवींद्र सानप (आम्ही शिरूरकर फाउंडेशन), आनंद पाटील (उद्योगपती तथा बंधू, आमदार अभिजीत पाटील), अंजलीताई अवताडे (सुविद्य पत्नी, आमदार समाधान अवताडे), नितीन सरडे (युवा नेते), गौरी खिस्ते (योगशिक्षिका), सचिन कुलकर्णी (मुख्य संपादक, शिवशाही न्यूज नेटवर्क), मनीषा कुलकर्णी (कार्यकारी संपादक, शिवशाही न्यूज नेटवर्क) यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘शिवशाही महारत्न’ पुरस्कारप्राप्त व्यक्ती
यावर्षी राज्याच्या विविध भागांतील १६ गुणवंत व्यक्तींना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल ‘शिवशाही महारत्न’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मंगेश चिवटे ( वैद्यकीय सेवा)
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षा'च्या माध्यमातून राज्यातील हजारो गरजू व सर्वसामान्य नागरिकांना ऐनवेळी वैद्यकीय मदत मिळवून दिली. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आरोग्याचे नंदनवन फुलवण्याच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रणजीत यादव (सोशल मीडिया)
सोशल मीडियाचा सकारात्मक व ज्ञानवर्धक वापर कसा करावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. देशातील घडामोडी, राजकीय व सामाजिक विषयांवर अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण करून घटनेच्या दोन्ही बाजू समाजासमोर मांडणे तसेच इतिहासातील घटनांवर सत्य व वास्तववादी विवेचन करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.
डॉ. सुनिता पोटे (आरोग्य सेवा)
शिरूर नगर परिषदेच्या नगरसेविका आणि वीज व पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्य करत असतानाच त्यांनी अल्प दरात व मोफत वैद्यकीय सेवा दिली. रस्त्यावर प्रसुती वेदनेने कासावीस झालेल्या गरीब महिलेची रस्त्यावरच यशस्वी प्रसुती करून तिचे व बाळाचे प्राण वाचवल्याच्या प्रसंगाने संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कर्तव्यभावनेचे कौतुक झाले.
पार्वती ताई आवताडे (आदर्श माता)
पतीच्या निधनानंतरही खचून न जाता मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना यशस्वी राजकारणी व उद्योजक म्हणून घडवले. त्यांच्या या कष्टाचे फळ म्हणजे त्यांचे चिरंजीव समाधान दादा अवताडे हे आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार म्हणून लोकसेवा करत आहेत. त्यांच्या या मातृत्वास व त्यागास शिवशाही परिवाराने वंदन केले.
डॉ. भारत गायकवाड (साहित्य)
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. आपल्या प्रभावी लेखणीने समाजाला नवी दिशा देत माणूसपण जपण्याचे काम त्यांच्या साहित्यातून होत आहे.
प्रा. डॉ. तानाजीराव माने (साहित्य)
महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यिक परंपरेला पुढे नेताना समाजमनाचे वास्तव प्रतिबिंब त्यांनी साहित्यात मांडले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर केवळ भाष्य न करता त्यावर सुलभ उपाय व उत्तरे शोधण्याचे कार्य त्यांच्या लेखणीने केले आहे.
वैशाली वाघमारे (शैक्षणिक)
गेली २६ वर्षे अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन, कलागुणांना प्रोत्साहन देत यशस्वी नागरिक घडवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
धनाजी देशमुख (कृषी सेवा)
‘भगवंत कृषी उद्योग’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक-पाणी, बियाणे, खते आणि औषधांच्या विक्रीसोबतच योग्य मार्गदर्शन देण्याचे काम केले. नफा-तोट्याचा विचार न करता संकटात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्याचे काम ते करत आहेत.
ॲड. संदीप वाघ (समाज सेवा)
प्रतिकूल परिस्थितीतून उद्योग उभा केल्यानंतर आपल्या कमाईचा मोठा भाग सामाजिक कार्यासाठी वापरला. ग्रामीण भागातील शाळांना आर्थिक व नैतिक मदत करणे, ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात योगदान आणि वृद्धांसाठी ‘विरंगुळा कट्टा’ ही संकल्पना राबवून ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला.
दशरथ वाघमोडे (पोलीस सेवा)
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्याचे तंतोतंत पालन करत पोलीस सेवेत कार्य केले. अत्यंत नम्र स्वभाव आणि हसतमुख चेहऱ्याने आव्हानांवर मात करत ‘गुड पोलिसिंग’चा उत्कृष्ट आदर्श समाजासमोर निर्माण केला.
सविता मुळीक (कृषी)
निसर्गाचा लहरीपणा आणि शेतीतील अनिश्चिततेवर मात करत डाळिंब व सीताफळ शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. अत्यंत कष्टाने आणि आधुनिक तंत्राचा वापर करून शेती पूरक व नफा मिळवून देणारा व्यवसाय कसा बनू शकतो, याचे उदाहरण त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर ठेवले.
डॉ. प्राजक्ता मेटकरी-खरात (संशोधन)
एम.एससी. ॲग्री व ॲग्रीकल्चरल सॉइल सायन्समध्ये पीएचडी प्राप्त केल्यानंतर गेल्या ९ वर्षांपासून माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत व योग्य मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन वाढवण्यात मोठी मदत झाली आहे.
ईश्वरप्रसाद रितापुरे (शिक्षण व संशोधन)
शासकीय फार्मसी महाविद्यालय, कराड येथे २५ वर्षांपासून अध्यापन कार्य करत आहेत. एनएसएस (NSS) प्रमुख म्हणून वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता मोहीम राबवली. फार्मसी विषयावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पद्मभूषण उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले असून महाविद्यालयाला ‘नॅक A+’ ग्रेड मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
विठ्ठल जिद्दीमणी (युवा उद्योजक)
अत्यंत सामान्य कुटुंबातून येत तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘वाई बिझनेस प्रो’ हा हायपरलोकल डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला. या माध्यमातून स्थानिक व्यापारी, व्यावसायिक, कामगार, रिक्षाचालक आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांना एकत्र आणून डिजिटल इकोसिस्टम तयार केली.
संजय चौधरी (संरक्षण सेवा)
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून १९८९ मध्ये भारतीय नौदलात भरती झाले. २०१३ पर्यंत तब्बल २५ वर्षे त्यांनी ‘आयएनएस विराट’ आणि ‘आयएनएस किरपान’ यांसारख्या युद्धनौकांवर देशसेवा बजावली.
सौ. सविता व श्री. रवि सोनार (आदर्श पती-पत्नी)
समाजसेवा, शिक्षण, पर्यावरण, साहित्य व अध्यात्म क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा जास्त काळ एकत्र कार्यरत. मातोश्री वृद्धाश्रम, नवरंगे बालकाश्रम, अंधशाळा यांसारख्या संस्थांना मदत करत आपल्या २६ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यात सामाजिक बांधिलकी जपून आदर्श दांपत्य म्हणून नावारूपास आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य संपादक सचिन कुलकर्णी व कार्यकारी संपादक मनीषा कुलकर्णी यांनी शिवशाही न्यूज नेटवर्कच्या चार वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. निष्पक्ष, निर्भीड आणि लोकहिताची पत्रकारिता जपण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी शिवशाही न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव केला. अत्यंत उत्साही व दिमाखदार वातावरणात या सोहळ्याची सांगता झाली.
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा







































