महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू; गावात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट, पर्यायी व्यवस्थेची ग्रामस्थांची मागणी
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वासोळे ग्रामपंचायत हद्दीत झाड कोसळून तब्बल सहा वीजखांब जमीनदोस्त झाले, तर दोन खांब गंभीररीत्या वाकल्याची घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी घडली. या दुर्घटनेमुळे वासोळे ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, संपूर्ण गावावर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढावले आहे.
मोठा अनर्थ टळला
घटना घडली त्या वेळी लगतच्या शेतात जनावरे चरत होती. वीजखांब पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच ही जनावरे असल्याने मोठा अपघात टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही.
दुरुस्तीच्या कामात वाऱ्याचा अडथळा
परिसरात पावसाचा जोर ओसरला असला तरी सोसाट्याचा वारा आणि मधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे दुरुस्तीच्या कामात मोठी अडचण निर्माण होत आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, खांबांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पहिल्या दिवशी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले नाही.
२ ते ३ दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची भीती
झाड कोसळून झालेल्या नुकसानीमुळे दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत गावाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
संबंधित विभागाने तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, तसेच दुरुस्तीचा काळ संपेपर्यंत प्रशासनाने गावात पर्यायी पाणीपुरवठ्याची सोय करावी, अशी जोरदार मागणी वासोळे येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
-------------
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























