वनविभागाचा भोंगळ कारभार उघड; उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील विरमाडे येथे विद्युत खांबावरील प्रवाहाचा धक्का लागून एका वन्य माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अतिसंवेदनशील घटनेनंतर वनविभागाचा बेजबाबदार आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, घटनेला तासनतास उलटूनही जबाबदार वनपाल घटनास्थळी न पोहोचल्याने विरमाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनरक्षकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली; मात्र, संबंधित भुईंज वनपरिमंडळाच्या वनपाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतरही घटनास्थळी हजर झाल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ व पत्रकारांनी या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सविता रेड्डी पाटील यांना दिल्यानंतरही संबंधित अधिकारी फिरकले नाहीत. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाचे मोठे दावे करणारा वनविभाग प्रत्यक्षात झोपेत आहे का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
आठवड्यातून केवळ एकच दिवस कार्यालय उघडे?
या घटनेच्या निमित्ताने ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. भुईंज वनपरिमंडळ कार्यालय हे आठवड्यातून केवळ एकाच दिवशी आणि तेही दुपारी उशिरा कार्यरत असते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून वास्तव जनतेसमोर आणावे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले जाणारे अभय बंद करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अमोल सातपुते यांच्याकडून कारवाईची अपेक्षा
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी 'हरितवारी वृक्षदिंडी'सारख्या उपक्रमांतून आणि लोकसहभागातून वनविभागाची राज्यभर एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे विरमाडे येथील या गंभीर प्रकाराची त्यांनी स्वतः दखल घेऊन निष्काळजी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि विभागाची विश्वासार्हता अबाधित ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
"वन्यजीवांच्या संरक्षणाच्या गप्पा मारणारा वनविभाग प्रत्यक्षात मात्र पूर्णपणे झोपलेला आहे. एका मुक्या प्राण्याचा मृत्यू होऊन तासनतास उलटले, तरी अधिकाऱ्यांना घटनास्थळी यायला वेळ नाही. अशा निष्काळजी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे."
स्थानिक ग्रामस्थ, विरमाडे
दरम्यान, जबाबदार अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास वनविभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विरमाडे व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


























