ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील पिराचीवाडी आणि वेरुळी परिसरात बिबट्याने अक्षरशः उच्छाद मांडला असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संजय विष्णू मांढरे यांच्या मालकीची किंमती खिलार जातीची कालवड बिबट्याने रात्रीच्या सुमारास फस्त केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे पशुपालकांमध्ये मोठी दहशत पसरली असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या या संकटाने नागरिक भयभीत झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच वेरुळी येथील जगन्नाथ पवार यांची शेळी देखील बिबट्याने अशाच प्रकारे फस्त केली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा जनावरांकडे लक्ष ठेवणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. वनविभागाला वारंवार माहिती देऊनही अधिकारी केवळ कार्यालयात बसून वेळकाढूपणा करत असल्याचा गंभीर आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
"परिसरात एक शेळी आणि कालवड फस्त केल्यानंतर आता वनविभाग एखाद्या नागरिकावर हल्ला होण्याची वाट बघतोय का?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना व पशुपालकांना दिलासा द्यावा, अन्यथा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
वनविभाग झोपला आहे का?
"परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीखाली जगत आहेत. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाचे अधिकारी खुर्ची उबवण्याचे काम करत आहेत. जनावरांचा बळी गेल्यानंतर आता प्रशासन एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल."
युवराज कोंढाळकर,
सामाजिक कार्यकर्ते
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























