जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांच्या कडून स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
दृष्टी नसली तरी ध्येयाची दृष्टी असेल, तर आकाशाला गवसणी घालता येते, हे साताऱ्याचे सुजित शिंदे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. शंभर टक्के दृष्टिहीन असूनही प्रचंड जिद्द, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होत वर्ग-१ अधिकारी बनलेल्या सुजित शिंदे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
शासकीय सेवेत उच्च प्रशासकीय पदावर पोहोचणाऱ्या शंभर टक्के दृष्टिहीन अधिकाऱ्यांमध्ये शिंदे यांची ही कामगिरी विशेष उल्लेखनीय मानली जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेबाबत समाजात असलेल्या अनेक गैरसमजांना छेद मिळाला असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो युवकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून स्वागत
योजना शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुजित शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर तसेच शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्व पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिंदे यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कामकाजासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रशासकीय कामकाजासाठी विशेष व्यवस्था
शिंदे यांना प्रशासकीय कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. दैनंदिन कामकाज, नस्ती व प्रशासकीय कागदपत्रांच्या हाताळणीसाठी त्यांना स्वतंत्र पूर्णवेळ सहायक कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. संबंधित कर्मचाऱ्याची योग्य पडताळणी करूनच आवश्यक स्वाक्षऱ्या केल्या जातील. त्यामुळे या कामात पारदर्शकता आणि जबाबदारीला विशेष महत्त्व राहणार आहे.
याशिवाय, प्रशासकीय कागदपत्रे आणि फाईल्स स्वतः वाचता याव्यात यासाठी अत्याधुनिक ‘डॉक्युमेंट रीडर’ मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी शिंदे प्रशासनाकडे करणार आहेत. सुमारे एक लाख रुपये किमतीच्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने कागदपत्रांवरील मजकूर डिजिटल पद्धतीने ऐकून त्यांना कामकाज अधिक स्वावलंबीपणे करता येणार आहे.
‘दृष्टी’पेक्षा ध्येय मोठे!
सुजित शिंदे यांचा हा प्रवास केवळ एका अधिकाऱ्याच्या नियुक्तीची बातमी नसून जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या विजयाची कहाणी आहे. शारीरिक मर्यादा ही यशाच्या मार्गातील अडथळा नसून योग्य संधी, तंत्रज्ञान आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही शिखर गाठता येते, याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.
त्यांच्या या यशामुळे दिव्यांग युवक-युवतींमध्ये नव्या आशेचा आणि आत्मविश्वासाचा संचार झाला असून, “मर्यादा शरीराला असतात; स्वप्नांना नाहीत,” हा संदेश सुजित शिंदे यांच्या यशातून अधोरेखित झाला आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























