माझी आई' कवितेने जिंकली रसिकांची मने - मोठमोठ्या नामवंत साहित्यिकांमध्ये बालकवयित्रीची बाजी
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
बहुजन साहित्य संघ, चिखली (जि. बुलढाणा) यांच्या वतीने पंढरपूर येथील पद्मनाभ कार्यालयात आयोजित ७ व्या बहुजन साहित्य संमेलनात द.ह. कवठेकर प्रशालेची इयत्ता सहावीतील ११ वर्षीय विद्यार्थिनी कु. सुरभी कुलकर्णी हिने आपल्या काव्यप्रतिभेचा डंका वाजवला. निमंत्रितांच्या कवी संमेलनात ज्येष्ठ आणि नामवंत कवींच्या मांदियाळीत तिने 'माझी आई' ही कविता सादर करत संमेलन गाजवले.
संविधान आणि ग्रंथ दिंडी
संमेलनाची सुरुवात संविधान आणि ग्रंथांच्या दिंडीने अत्यंत उत्साहात झाली. या सोहळ्याला माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष ॲड. विजय कस्तुरे, संमेलनाध्यक्ष नागेश सिंघण, आणि स्थानिक संयोजक विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांसह राज्यभरातून आलेले साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा, कथाकथन, 'वारी कवितेची' आणि निमंत्रितांचे कवी संमेलन असे विविध रंगतदार कार्यक्रम पार पडले.
सुरेल गायनाने मिळवली उपस्थितांची दाद
महाराष्ट्रातील दिग्गज कवींचा सहभाग असलेल्या निमंत्रितांच्या कवी संमेलनात सुरभी कुलकर्णी हिने अत्यंत सुरेल आवाजात आणि सभाधिटपणे 'माझी आई' ही कविता सादर केली. तिची शब्दरचना, आशयघनता आणि सादरीकरण पाहून उपस्थित मान्यवर व रसिकांनी तिला उत्स्फूर्त दाद दिली. या कौतुकास्पद यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पेशवाई पैठणी प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला.
वडिलांचे मार्गदर्शन व शाळेचा पाठींबा
सुरभीला तिचे वडील प्रसिद्ध कवी सचिन कुलकर्णी यांचे निरंतर प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले आहे. अतिशय कमी वयात तिच्यातील उमललेली प्रतिभा आणि काव्यगुणांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल द.ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी, वर्गशिक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सुरभीचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























