संस्कृती, सण याबरोबरच देश प्रेमाची भावना
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित द्रविड हायस्कूल, वाई येथे रक्षाबंधन या पवित्र सणाचे औचित्य साधून ‘ एक राखी सैनिकासाठी’, ‘वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाची शपथ’ आणि ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ असे विविध उपक्रम विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहकार्याने उत्साहात राबविण्यात आले.
व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे ढवळीकर सभागृहात प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली. शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने ग्राहकांशी संवाद साधत राख्यांची विक्री केली. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष विक्रीव्यवहाराचा अनुभव मिळाला.
विक्रीतून मिळणारी रक्कम, झालेला खर्च, नफा तसेच ग्राहकांना दिली जाणारी सवलत यांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहारातून समजून घेतली. काही विद्यार्थ्यांनी नफा मिळाल्यानंतरही ग्राहकांना सवलतीच्या दरात राख्या विकून व्यवहारकौशल्य, सामाजिक जाणीव आणि उद्योजकतेची भावना यांचा सुंदर समन्वय साधला.
‘एक राखी सैनिकासाठी’ उपक्रमातून देशप्रेमाची भावना
‘एक राखी सैनिकासाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. भारताच्या सीमेवर प्रतिकूल व खडतर परिस्थितीत राहून भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल ५०० राख्या तयार करून पाठविल्या.
यासोबतच विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी आपल्या मनातील भावना लिखित संदेशातून व्यक्त केल्या. “आपण देशाच्या सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही बिनधास्तपणे आपले सण साजरे करू शकतो. आपल्या त्यागाची परतफेड कोणतीही वस्तू भेट देऊन होऊ शकत नाही,” अशा भावनिक भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात शाळेचे NCC ऑफिसर महेश इनामदार यांच्या मागदर्शनातून - NCO, 22 महाराष्ट्र बटालियन N. C. C. सातारा चे हवालदार नारायण गोळे यांना विद्यार्थीनींनी राखी बांधली. त्यानंतर ५०० राख्या शालेय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीमेवरील सैनिकांना पाठविण्यासाठी सुपूर्त करण्यात आल्या.
पर्यावरणप्रेम आणि देशप्रेमाचा संदेश
शाळेतील शिक्षिका सौ. विद्या मर्ढेकर यांच्या मागदर्शनातून स्काऊट गाईड ' अंतर्गत 5 वी च्या विद्यार्थींनी नी तयार केलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी प्रेम व संवेदनशीलता निर्माण झाली, तसेच सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवून देशप्रेम व राष्ट्राभिमानाची भावना दृढ झाली.
‘राखी विक्रीतून स्वकमाई’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आर्थिक शिस्त, नियोजन, विक्रीकौशल्य, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची भावना विकसित झाली. स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून मिळविलेली स्वकमाई विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली. या उपक्रमाचे नियोजन तसेच राखी तयार करण्याचे मार्गदर्शन महावीर कुपाडे यांनी इतर शिक्षकांच्या सहकार्याने केले.
उपक्रमासाठी मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, उपशालाप्रमुख सौ. नेत्रा मुळे आणि पर्यवेक्षक घनःश्याम नवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे शालेय समितीचे अध्यक्ष नितीन पोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
एकंदरीत, ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून व्यवसायाचे धडे देणारा, आर्थिक व्यवहारांची जाणीव करून देणारा आणि आत्मविश्वास वाढविणारा ठरला. ‘शिकता शिकता कमवा आणि उद्योजकतेची बीजे रुजवा’ या संकल्पनेला या उपक्रमातून सुंदर प्रतिसाद मिळाला.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























