रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करा; अमरावतीसारखी दुर्घटना टाळा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा आणि जावली तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासोबतच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील, यासाठी आरोग्य विभागाने अधिक जबाबदारीने काम करावे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करा, अशा सूचना राज्याचे बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची सभा पार पडली. यावेळी सातारा-जावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आढावा घेण्यात आला. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. एस. के. चव्हाण यांनी दोन्ही तालुक्यांचा आढावा सादर केला.
जावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ सात प्रसुती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी एवढ्या कमी प्रसुती का झाल्या, अशी विचारणा केली. धावली येथील सिस्टर काटकर यांचे काम चांगले असून त्या एकही प्रसुती साताऱ्याला पाठवत नाहीत. त्यांच्यासारखे काम झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
लिंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामात कोणत्या अडचणी आहेत, याबाबत तक्रारी आल्याचे सांगत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन जागेची मोजणी करण्याच्या सूचना दिल्या. केळघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसुतीगृहाची जागेची समस्या सोडवून प्रसुतीगृह तळमजल्यावर घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पशुसंवर्धन विभागाच्या जागेचा वापर करण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या.
आनेवाडी-सायगाव येथील रुग्णांना कुडाळ येथे उपचार दिले जात नसल्याची तक्रार वसंतराव मानकुमरे यांनी केली. त्यावर रुग्णांना कुठेही उपचार मिळाले पाहिजेत, गावांची सीमा ठेवू नका, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रशस्त जागा असून इमारतीचे नूतनीकरण करावे, अशी मागणी आमदार मनोज घोरपडे यांनी केली. सोमर्डी येथील पाणी गुणवत्ता कार्यालयाच्या इमारतीचा प्रलंबित प्रस्ताव पाठविण्याच्या तसेच ज्या ठिकाणी शिपाई पदाचा कर्मचारी वर्ग कमी आहे, तेथे पदे भरण्याच्या सूचनाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दिल्या.
जिल्हा रुग्णालयात दक्षता घ्या
अमरावती येथे घडलेली दुर्घटना अत्यंत वाईट आहे. तशी घटना आपल्या येथे घडू नये, यासाठी जिल्हा रुग्णालयाचे ऑडिट करून घ्या, अशा सक्त सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव यांना दिल्या.
आयसीयू कक्ष, प्रसुती कक्ष, ऑक्सिजन सुविधा, फायर फायटिंग व्यवस्था आणि शस्त्रक्रिया विभागाची तज्ज्ञांच्या उपस्थितीत वैयक्तिक पाहणी करावी. रुग्णालयाची इमारत जुनी असून वायरिंगही जुने असण्याची शक्यता आहे. त्याचीही तपासणी करावी. एखादी दुर्घटना घडल्यास काय उपाययोजना करायच्या, याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला गैरहजर रुग्णालयांना नोटीस
सभेला बोलावूनही ज्या रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाहीत, त्यांना नोटीस बजावण्याची सक्त ताकीद मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. सातारा शहरातील काही रुग्णालयांमध्ये शासकीय सेवा दिल्या जात नसल्याचा मुद्दा कामेश कांबळे यांनी उपस्थित केला. संबंधित रुग्णालयांना शासकीय योजनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी विनंती करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना दिल्या.
‘१०८’ रुग्णवाहिकांबाबत चौकशीचे आदेश
उपाध्यक्ष राजू भोसले यांनी ‘१०८’ रुग्णवाहिकांमधून अपघातग्रस्तांना खासगी रुग्णालयात नेले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. रुग्णवाहिका चालक आणि संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी बीव्हीजीला नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या.
पहिल्या वैद्यकीय पदवीधरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आढाव्यादरम्यान महाविद्यालयाची पहिली बॅच २०२१ मध्ये झाली असून पुढील वर्षी त्यांची पदवी पूर्ण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पदवीदान सोहळ्याचे चांगले आयोजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्याने डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे सांगितले. महाविद्यालय सप्टेंबरअखेरपर्यंत स्थलांतरित होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
सभापती महेश गाडे यांनी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची टक्केवारी कमी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना मिरज येथे पाठविण्याची वेळ का येते, असा सवाल त्यांनी केला. याबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी आवश्यक सूचना दिल्या.
जिल्ह्यात ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून शासन दरवर्षी रुग्णसेवेसाठी मोठा निधी खर्च करत आहे. मात्र सरकारी रुग्णालयांमधील प्रसुती आणि ओपीडीचे प्रमाण कमी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जाणारा गरीब आहे, अशी प्रतिमा बदलण्याची गरज आहे. दवाखाने २४ तास सुरू राहिले पाहिजेत, ओपीडी वाढली पाहिजे आणि शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी खंत उपाध्यक्ष राजू भोसले यांनी व्यक्त केली.
सभेला आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, कृषी सभापती लता कर्णे, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, जावलीचे सभापती सौरभ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सर्जेराव सावंत, कामेश कांबळे, निता खरात, जयश्री गिरी, कविता ओंबळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रकल्प संचालक विश्वास सिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गाढवे आदी उपस्थित होते.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























