खंडाळ्यात वार्षिक सर्वसाधारण सभा व आरोग्य कॅम्प
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सोमवार, दि. ०६ जुलै २०२६ रोजी खेड बु. (ता. खंडाळा) येथे राजमुद्रा महिला प्रभागसंघ आणि जीवनशिल्पी महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी संपन्न झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून खेड बु. येथे प्रभागसंघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक प्रार्थना, सरस्वती पूजन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राजमुद्रा प्रभागसंघाच्या पदाधिकारी आणि जीवनशिल्पी कंपनीच्या संचालकांच्या वतीने आंब्याची रोपे, नारळ आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. पर्यावरणपूरक स्वागताच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
सदर सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सातारा येथील महिला व बालकल्याण सभापती ऋतुजा शिंदे, समाजकल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे पाटील, खंडाळा पंचायत समितीच्या सभापती छाया जाधव, सदस्या वंदना धायगुडे पाटील, गटविकास अधिकारी (वर्ग १) अनिल वाघमारे, माजी सरपंच गणेश धायगुडे पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ओमकार कोंडे, आर्थिक साक्षरता सल्लागार नितीराज साबळे, बँक ऑफ महाराष्ट्र खंडाळा शाखेच्या प्रमुख मेरी मॅडम, तालुका अभियान व्यवस्थापक प्रविण खुडे, तालुका व्यवस्थापक (एमआयएस) राजेश चव्हाण, भादे प्रभाग समन्वयक रेश्मा धायगुडे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी यादव, आणि ब्लॉक अँकर मनोज माने आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रभागसंघाच्या अध्यक्षा मीनाक्षी सोळस्कर, सचिवअदिती गोळे व कोषाध्यक्ष करिष्मा धायगुडे यांनी वार्षिक कामकाजाचा अहवाल सादर केला. लिपिकांनी आर्थिक अहवालाचे वाचन केले, ज्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. जीवनशिल्पी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक शिल्पा गावडे व सुनंदा धायगुडे यांनी इतिवृत्त वाचन करून पुढील वर्षात जास्तीत जास्त सभासद आणि शेअर्स वाढवण्याबाबत मोलाची माहिती दिली. आगामी वर्षाचे आर्थिक नियोजन आणि विविध विकासकामांचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
या सभेत केवळ कामकाजावर चर्चा न होता महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. प्रभागातील व्यवसाय करणाऱ्या एकल महिला, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या महिला आणि वैयक्तिक अर्थसाह्य घेऊन उद्योग उभा करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसंघांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच 'सेकंड चान्स' उपक्रमातील महिलांचाही सन्मान झाला. सभेत उपस्थित पात्र महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे उद्योग आधार कार्ड आणि फूड लायसन्स काढून देण्यात आले. तसेच FNHW अंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत आरोग्य, ब्लड, शुगर आणि एचबी (Hb) तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राजमुद्रा महिला प्रभागसंघाच्या सर्व पदाधिकारी, ज्ञानमुद्रा प्रभागसंघ (भादे) चे पदाधिकारी, प्रभागसंघ मॅनेजर आणि जीवनशिल्पी कंपनीच्या संचालकांनी केले. तर माहिती संकलन व संयोजन काशिनाथ कुंभार (प्रभाग समन्वयक) यांनी केले. शेवटी प्रभागसंघाच्या सचिव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



