राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या ओझर्डे येथील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा दिमाखदार गुणगौरव सोहळा
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
"ग्रामीण भागातच खरे टॅलेंट दडले आहे. गुणवान विद्यार्थी घडत असताना पालकांनी मुलांवर आणि शिक्षकांवर पूर्ण भरोसा व विश्वास ठेवला पाहिजे. मुलांनी शिक्षकांचे ऐकले तर त्यांचे भविष्य निश्चितच सुंदर घडेल. 'पीएमश्री' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे येथील कु. स्वरा आशुतोष गार्डी हिने इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (२०२६) राज्यात प्रथम क्रमांक, तर स्वराज श्रीनिवास कुंभार याने राज्यात चौथा क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. हे यश शिक्षकांच्या अथांग परिश्रमांचे फळ असून, या मराठी शाळेचा आदर्श जिल्ह्यातील इतर शाळांनी घ्यावा," असे प्रतिपादन कलासागर अकॅडमीचे संचालक लहुराज पांढरे यांनी केले.
'पीएमश्री' जि.प. प्राथमिक शाळा ओझर्डे येथे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा जमदाडे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून कृषिमित्र अरुण आदलिंगे, योगेश पिसाळ, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका सविता क्षीरसागर, शोभा पवार आणि सुनील गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठी शाळा वाचवण्यासाठी 'शिक्षण चळवळ' बळकट करा: अरुण आदलिंगे
कार्यक्रमात बोलताना कृषिमित्र अरुण आदलिंगे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात खरी 'क्रांती' ग्रामीण भागातील विद्यार्थीच घडवू शकतात. आजच्या काळात राज्यात अनेक शाळांची पडझड होत असून पटसंख्येअभावी शाळा बंद पडत आहेत. अशा कठीण परिस्थितीतही ओझर्डे मराठी शाळेने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मराठी शाळा वाचवण्यासाठी व त्या टिकवण्यासाठी 'शिक्षण चळवळ' अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दिमाखदार सोहळा आणि उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागताने झाली. मुख्याध्यापिका सौ. रेखा जमदाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला. यानंतर सुनील गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्याला ॲड. प्रतापसिंह पिसाळ देशमुख, जयश्री कांबळे, शशिकांत भंडारे, अनुष्का पिसाळ, सुषमा पिसाळ, सुप्रिया जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. शोभा पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. मंगल फरांदे यांनी मानले. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



