आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
शिवशाही वृत्तसेवा, वेळापूर (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर यांनी नुकतीच वेळापूर येथील 'गरूड बंगला' येथे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माळशिरस तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा पार पडली.
तालुक्याच्या वतीने जंगी स्वागत
या प्रसंगी आमदार उत्तमराव जानकर आणि माळशिरस तालुक्याच्या वतीने मंत्री महोदयांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
आरोग्य सुविधांच्या विकासासाठी आक्रमक पाठपुरावा
आमदार उत्तमराव जानकर यांनी मंत्री महोदयांकडे माळशिरस मतदारसंघातील आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचे सविस्तर निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली:
अत्याधुनिक रुग्णालय: माळशिरस येथे १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरची निर्मिती.
आरोग्य केंद्र श्रेणीवर्धन: पिलीव, वेळापूर व माळीनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन करणे.
अकलूज रुग्णालय: अकलूज उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे व CT Scan मशीन मंजूर करणे.
डायलिसिस केंद्र: माळशिरस ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र तातडीने सुरू करणे.
रिक्त पदे: तालुक्यातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी.
जनतेच्या आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध - आ. उत्तमराव जानकर
या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, "माळशिरस तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळावी, हे माझे ध्येय आहे. आरोग्यमंत्र्यांशी झालेली चर्चा सकारात्मक असून, या मागण्या मार्गी लावण्यासाठी आम्ही शासन स्तरावर सातत्याने प्रभावी पाठपुरावा करत आहोत. जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
या भेटीमुळे माळशिरसच्या आरोग्य सुविधेच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



