मुलांच्या संघाला कांस्य, तर यशदा वाडकरला दुहेरी रौप्यपदक; 'वर्षातील सर्वोत्तम खेळाडू' पुरस्काराने गौरव
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
नाशिक येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दि. २८ व २९ जून २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय सीनियर जंप रोप स्पर्धेत वाई तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, बोरगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आपल्या दैदिप्यमान कामगिरीने विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्पर्धेतील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ३० सेकंद स्पीड रिले या प्रकारात बोरगाव विद्यालयाच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक (तृतीय क्रमांक) पटकावले. या विजयी संघात इयत्ता नववीतील श्रवण वाडकर, यश मालुसरे, ऋषभ मांढरे, अनुज महांगडे, ऋतिक मांढरे या खेळाडूंचा समावेश होता.
विद्यालयाची नववीतीलच अष्टपैलू खेळाडू यशदा मेघा वाडकर हिने ३० सेकंद स्पीड आणि फ्री स्टाईल अशा दोन्ही वैयक्तिक प्रकारांत अप्रतिम कौशल्य दाखवत रौप्यपदक (द्वितीय क्रमांक) आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण वर्षात तिने विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गाजवलेल्या वर्चस्वामुळे महाराष्ट्र राज्य जम्परोप संघटनेकडून तिला 'वर्षातील सर्वोत्तम खेळाडू' आणि 'राष्ट्रीय पदक विजेती' हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान देऊन गौरविण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा जंप रोप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अजित वाडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष नारायण वाडकर, सचिव मधुकर वाडकर, संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव वाडकर, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संतोष वाडकर, शिक्षकवृंद आणि पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
तसेच, सातारा जिल्ह्याच्या नूतन क्रीडा अधिकारी संगिता जगताप व जंप रोप असोसिएशनचे जिल्हा सचिव नितीन सुरवसे यांनी विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन करून त्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



