कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट दिपाली गायकवाडची नौदल प्रशिक्षणासाठी निवड

ओडिशातील कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण; महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या १२ मुलींमध्ये पटकावले स्थान

Selection for Naval Training, Chhatrapati Sambhaji Nagar, Kannad, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)

येथील शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट कु. दिपाली गायकवाड हिची भारतीय नौदलाच्या (Indian Navy) प्रतिष्ठित प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, तिने ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेले अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या यशानंतर ती पुढील सेवेसाठी विशाखापट्टणम येथे रुजू होत आहे.

महाराष्ट्रातून केवळ १२ मुलींची निवड

या विशेष नौदल प्रशिक्षणासाठी देशभरातून सुमारे ११६ मुलींची निवड करण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अवघ्या १२ मुलींना हा बहुमान मिळाला असून, त्यात कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. दिपाली गायकवाड हिने आपले स्थान निश्चित केले. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण कन्नड परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्याची लेक; जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यश

कु. दिपाली ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी असून सध्या ती शिवाजी महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, केवळ शिस्त, समर्पण, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. एक गुणवंत व कर्तृत्ववान विद्यार्थिनी म्हणून ओळख असलेल्या दिपालीने एनसीसी कॅडेट म्हणून काम करताना आतापर्यंत सहा वेगवेगळ्या शिबिरांमध्ये (Camps) सक्रिय सहभाग नोंदवून आपली चमक दाखवली आहे.

एनसीसी प्रमुखांचा सन्मान व दिपालीवर कौतुकाचा वर्षाव

दिपालीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी श्री. मानसिंह पवार, डॉ. ए. के. महाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले, उपप्राचार्य डॉ. बी. के. मगर आणि श्री अभय आहेर यांनी तिचे विशेष कौतुक केले. तसेच एनसीसी विभागप्रमुख लेफ्टिनंट डॉ. विजय मातकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आहेर, प्रा. नागे, प्रा. पवार, प्रा. मोगरे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी दिपालीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून, दिपालीला उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल एनसीसी प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. विजय मातकर यांचाही महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !