विद्यानिकेतन वसतिगृहात दप्तर वाटप
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 'संकल्प फाउंडेशन'च्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. विद्यानिकेतन मुलांच्या वसतिगृहातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशनतर्फे नवीन शालेय दप्तरांचे (स्कुल बॅग्स) वाटप करण्यात आले. नवीन दप्तरे हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळते, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संकल्प फाउंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, जीवनात अभ्यासातील सातत्य, शिस्त आणि कठोर मेहनतीचे काय महत्त्व असते, याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यानिकेतन मुलांच्या वसतिगृहाद्वारे चालणाऱ्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. भविष्यातही या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, "समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढे येणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. संकल्प फाउंडेशनने दाखवलेल्या या आपुलकीमुळे आमच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल." असा विश्वास यावेळी विद्यानिकेतन मुलांचे वसतिगृह व्यवस्थापनाने व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यानिकेतन मुलांच्या वसतिगृहाच्या वतीने संकल्प फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



