मुसळधार पावसामुळे घाट बनतोय धोकादायक; रात्रीच्या वेळी भीषण अपघाताची भीती
मागील काही दिवसांपासून वाई तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता थेट घाटरस्त्यांना बसू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी पसरणी घाटात दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच, आता दत्त मंदिराशेजारील संरक्षक कठडा कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. यामुळे घाटातील वाहतूक कमालीची धोकादायक बनली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कठडा कोसळल्यामुळे रस्त्याच्या बाजूला थेट दरी निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने, स्थानिक प्रवाशांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या कठड्याजवळ छोटे-छोटे दगड ठेवून तात्पुरती धोक्याची सूचना दिली आहे. मात्र, मुसळधार पाऊस आणि घाटातील दाट धुक्यामुळे हा उपाय अत्यंत अपुरा ठरत आहे.
पसरणी घाटात सध्या दाट धुके आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. अशा वातावरणात, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा आणि शेजारील दरीचा अंदाज येणे कठीण झाले आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष न दिल्यास एखादे वाहन थेट दरीत कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स उभारावेत, रात्रीच्या वेळी लांबून दिसेल असे रिफ्लेक्टर किंवा हायलाईटेड इशारा फलक लावण्यात यावेत, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता संरक्षक कठड्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, संपूर्ण पसरणी घाटात मुसळधार पावसामुळे कुठे धोका निर्माण झाला आहे का, याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करावी, तसेच प्रशासनाने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता, या धोकादायक ठिकाणी २४ तासांच्या आत सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता वाहनचालक आणि वाईकरांमधून होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



