बावधानला होणार नवीन पीएससी ची इमारत - ऋतुजाताई शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन गटातील व परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि आशादायी पाऊल उचलण्यात आले असून, लवकरच बावधन येथे नवीन व अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएससी) इमारत साकार होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजाताई विराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, बावधन येथे 'जन आरोग्य समिती'ची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत आरोग्य केंद्रातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय आरोग्य योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आणि भविष्यातील गरजांचा विचार करून विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बोलताना सौ. ऋतुजाताई शिंदे यांनी बावधन पीएससीचे आधुनिकीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. "बावधन प्राथमिक आरोग्य केंद्र हे केवळ एक आरोग्य केंद्र न राहता, संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श आणि 'नंबर वन पीएससी' म्हणून ओळख निर्माण करेल. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला शहरांप्रमाणे गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे हा आपला संकल्प आहे," असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत आरोग्य क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. आयडीबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक एक्स-रे मशीन, एआय-सक्षम संगणक प्रणाली तसेच १६ ऑटो-क्लेव्ह (निर्जंतुकीकरण) मशीन सुपूर्द करण्यात आली. या आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांचे निदान अधिक जलद व अचूक होणार असून, उपचार सेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे.
बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, हिंदुराव (नाना) पिसाळ, सागर मांढरे, सुरज निकम, तुषार पिसाळ, ज्ञानेश्वर गाढवे, गटातील सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भोईटे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका तसेच आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बावधनसह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू झालेला हा विकासाचा प्रवास भविष्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नवीन पीएससी इमारत, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा यांच्या माध्यमातून बावधन आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



