खासदार नितीन पाटील यांचे आवाहन; 'किसन वीर' व 'खंडाळा' कारखान्यांचा मिल रोलर पूजन सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
"किसन वीर साखर कारखान्याचे जवळपास ६५ हजार सभासद आहेत. प्रत्येक सभासदाने जर आपला केवळ १० टन ऊस कारखान्यास गाळपासाठी दिला, तरी कारखान्याचे गाळप ६ लाख ५० हजार मेट्रिक टन सहज होऊ शकते. अशा पद्धतीने ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस कारखान्याकडे पाठविल्यास गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आणि एकदा का गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले, तर 'किसन वीर' कारखान्याचा भविष्यकाळ कसा असेल हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज भासणार नाही, तो निश्चितच उज्ज्वल असेल," असा ठाम विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केला.
किसन वीर व किसन वीर-खंडाळा या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या निमित्ताने आयोजित 'मिल रोलर पूजन' कार्यक्रमात खासदार नितीन पाटील मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, बावधन तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांसह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना खासदार पाटील पुढे म्हणाले की, एनसीडीसी बँकेने मंजूर केलेले कर्जरुपी पैसे हे फक्त आणि फक्त बँकांचे जुने कर्ज भागविण्याकरिताच वापरण्यात आलेले आहेत. खंडाळा कारखान्याच्या सर्व बँकांचे ओटीएस (वन टाइम सेटलमेंट) पूर्ण झाले असून, किसन वीर कारखान्याचे केवळ दोन बँकांचे ओटीएस बाकी आहे; ते देखील लवकरच पूर्ण होईल. दोन्ही कारखान्यांची संपूर्ण कर्जे फेडल्यानंतर पुढील एक ते दीड वर्षात कारखान्याचे नेटवर्थ वाढेल, ज्यामुळे बँकांकडून नियमित कर्जवाटप पुन्हा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना ऊस बिल पंधरवडा वाईज मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागेल; परंतु शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी व्यवस्थापनाच्या वतीने दिली.
"हा कारखाना वाचविण्याचे पवित्र काम राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील आणि आम्ही एकत्रितपणे करीत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला देण्याची जबादारी पार पाडावी," असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. मागील हंगामात अतिवृष्टीमुळे हेक्टरी उत्पादन घटले असतानाही, किसन वीरने प्रतिदिन ५,००० ते ५,५०० मेट्रिक टन आणि खंडाळा कारखान्याने ३,४०० मेट्रिक टनाने गाळप केले होते. आगामी २०२६-२७ च्या हंगामासाठी दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक तोडणी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, 'किसन वीर'चे ७ लाख टन व 'खंडाळा'चे ४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपला संपूर्ण ऊस याच कारखान्यांना घालावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मागील चार हंगामात अनेक अडचणींवर मात करत व्यवस्थापनाने अत्यंत पारदर्शक कारभार केला आहे. सर्व ऊस उत्पादकांची बिले बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, मागील व्यवस्थापनाच्या काळातील २०२०-२१ मधील प्रलंबित ६४ कोटींची बिले देखील चालू प्रशासनाने वर्ग केली आहेत. नामदार मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनामुळे कारखान्याचे अनेक जटील प्रश्न सुटले असून, उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील.
या सोहळ्यास कारखान्याचे संचालक बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, हिंदुराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, सुशिला जाधव, तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, संचालक ज्ञानेश्वर भोसले, पंचायत समितीचे सभापती भैय्यासाहेब डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन मोहन जाधव यांसह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
ज्यांचे संस्थेसाठी योगदान नाही, अशांनी संस्थेबाबत बोलू नये: खासदार नितीन पाटील
मागील काही दिवसांपासून एक महाशय 'किसन वीर' कारखान्याबाबत सोशल मीडियावरून दिशाभूल करणारी विधाने करत असून, चांगल्या चाललेल्या संस्थेबद्दल अपप्रचार करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींचा समाचार घेताना खासदार नितीन पाटील म्हणाले की, "ज्यांनी या संस्थेत ऊसाचे एक टिपरेही घातलेले नाही, ती व्यक्ती आज संस्थेच्या हितचिंतकाचा आव आणत आहे. ज्यांचे संस्थेसाठी कवडीचेही योगदान नाही, त्यांना कारखान्याबाबत बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही." सभासदांनी अशा अपप्रवृत्तींना थारा न देता कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



