आर्थिक संकटातही मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी घोडदौड
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, जावली व कोरेगाव या सहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने' शासकीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. कारखान्याने आर्थिक संकटाचा सामना करत असतानाही शासनाचा कर वेळेत भरून आदर्श घालून दिला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर (व्हॅट) भरणा केल्याबद्दल आणि कायदेशीर शिस्तीचे तंतोतंत पालन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभाग (सातारा) यांच्या वतीने कारखान्याला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी हा बहुमान मिळाला आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिला आधार
काही वर्षांपूर्वी किसन वीर कारखान्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. कोणत्याही बँकेकडून वित्तसहाय्य मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि भविष्याचे काय होणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांनी कारखान्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.
गेल्या चार वर्षांत या खंबीर नेतृत्वामुळे केवळ कारखाना सुरूच राहिला नाही, तर शेतकरी, वाहन मालक आणि व्यापारी यांची सर्व थकीत देणी वेळेवर देण्यात आली. कोणत्याही बँकेच्या आर्थिक मदतीशिवाय केवळ चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची संपूर्ण रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
पारदर्शक कारभाराची पोचपावती: प्रमोद शिंदे
या गौरव सोहळ्याबद्दल बोलताना कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले की, "नामदार मकरंद पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कारखान्याच्या हितासाठी व्यवस्थापनाने काही कठोर निर्णय घेतले आणि सुधारणा केल्या. त्यामुळेच आज सर्व स्तरावर कारखान्याप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे."
ते पुढे म्हणाले, "आर्थिक शिस्त पाळत आम्ही जीएसटी (GST), इन्कम टॅक्स, व्हॅट, आणि कामगारांचा प्रॉव्हिडंड फंड (PF) यांसारखे सर्व शासकीय कर नियमितपणे भरण्यावर भर दिला. सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कारखान्यावरील पारदर्शक कारभाराची पोचपावती असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नातील ‘किसन वीर’ पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोहोचत असल्याची ही उत्तम चिन्हे आहेत.
"प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान
राज्य कर सहआयुक्त श्रीमती प्रज्ञा पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण आणि चीफ अकाउंटंट आर. जी. उन्हाळे यांनी कारखान्याच्या वतीने हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
किसन वीर कारखान्याला मिळालेल्या या राष्ट्रीय व शासकीय पातळीवरील गौरवाबद्दल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून कारखान्याचे कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



