जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्ते करण्यात आले सप्ताहाचे उद्घाटन
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या "गंमत-जंमत सप्ताहास" आज जिल्हाभर उत्साहात प्रारंभ झाला. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये संबंधित जिल्हा परिषद सदस्यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे जिल्हाभर अंगणवाडी केंद्रांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजा शिंदे यांच्या हस्ते मौजे उडतारे, ता. वाई येथील अंगणवाडी केंद्रात सदर सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सभापती सौ. ऋतुजा शिंदे यांनी सांगितले की, गंमत-जंमत सप्ताहाचा मुख्य उद्देश अंगणवाडीची पटसंख्या वाढविणे आणि बालकांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे हा आहे. शून्य ते सहा वर्षे हा बालकांच्या सर्वांगीण विकासाचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी असून, या वयोगटात लागलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकून राहतात. त्यामुळे बालकांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी हा सप्ताह निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, बालकांच्या पोषणासाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आला असून, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पोषण आहारामध्ये गुळाचा वापर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच अंगणवाडी व्यवस्थापन अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी 'AI अंगणवाडी' या संकल्पनेविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये हा सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करून जास्तीत जास्त पालक व बालकांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, वाई पंचायत समितीच्या उपसभापती सौ. वर्षाताई जगताप, वाई पंचायत समिती सदस्या सुरभीताई भोसले, सौ. राणीताई पवार, उडतरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अर्चना पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ( महिला व बाल विकास) नागेश ठोंबरे,वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल आदमुलवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. संगीता सावंत, तसेच उडतारे गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक व नागरिक व छोटे बालचू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



