चांदक येथे महिलांच्या हस्ते 'हरित मोहिमे'चा श्रीगणेशा.
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
चालू वर्षात पर्यावरण संवर्धनाचा मोठा संकल्प सोडत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाई तालुक्यात विविध रस्त्यांच्या कडेला सुमारे ३५०० वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य उपक्रमाचा शानदार शुभारंभ नुकताच वटपौर्णिमेचे औचित्य साधून चांदक (ता. वाई) येथे स्थानिक महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आणि वाई उपविभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीत वृक्षांना पूजनीय मानणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणा दिवशीच या मोहिमेची सुरुवात करून विभागाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.
चांदक येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय सैदाने यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या हस्ते झाडे लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमामुळे वाई तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या 'हरित मोहिमेचे' सर्व स्तरांतून कौतुक होत असून, लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही चोखपणे पार पाडली जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
"निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि रस्त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हा वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वाई उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध रस्त्यांच्या कडेला ही झाडे लावली जात असून, येत्या जुलै अखेरपर्यंत सर्व ३५०० झाडे लावण्याचे काटेकोर नियोजन कार्यालयाने केले आहे."
-- महेश गोंजारी (उप अभियंता, वाई उपविभाग)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



