पश्चिम भागाचे विकासस्वप्न पाहणारे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव शेठ सणस यांचे आकस्मिक निधन

जनतेचा आधारवड हरपला

Dnyandeo sanas passed away, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

रेणावळे गावचे सुपुत्र, पश्चिम भागातील जनतेच्या सुख-दुःखात सदैव धावून जाणारे, समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि कोरोना काळात शेकडो नागरिकांसाठी देवदूत ठरलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.  ज्ञानदेव शेठ सणस यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण पश्चिम भागात शोककळा पसरली असून सर्वसामान्य जनतेच्या मनातील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंचायत समिती येथे बैठकीसाठी गेले असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचारासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि त्यांच्या प्राणज्योतीचे दुःखद निधन झाले.

ज्ञानदेव शेठ सणस हे केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर समाजासाठी झटणारे एक संवेदनशील नेतृत्व होते. अडीअडचणीत सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या खर्चाने मदतीचा हात देणे हा त्यांचा स्वभावच होता. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्वरूपाची मदत केली.

कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी पश्चिम भागातील अनेक नागरिकांसाठी देवदूताची भूमिका निभावली. औषधे, अन्नधान्य, वैद्यकीय मदत, रुग्णांना आवश्यक ते सहकार्य अशा विविध माध्यमांतून त्यांनी असंख्य कुटुंबांना आधार दिला. संकटसमयी लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

पश्चिम भागाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न त्यांनी कायम डोळ्यांसमोर ठेवले. "पश्चिम भाग विकासाच्या बाबतीत पुढे गेला पाहिजे, हा भाग सुजलाम-सुफलाम झाला पाहिजे," ही त्यांची भूमिका प्रत्येक भाषणातून आणि प्रत्येक कृतीतून दिसून यायची. विकासाचा दूरदृष्टीने विचार करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. पश्चिम भागातील जनतेच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि प्रभावीपणे काम करता यावे, या उद्देशानेच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे ते नेहमी सांगत असत.

ज्ञानदेव शेठ सणस यांनी श्री काळेश्वरी ट्रस्ट, रेणावळेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला.

त्यांचा जीवनप्रवासही अनेकांसाठी प्रेरणादायी होता. अवघे पन्नास रुपये खिशात घेऊन मुंबईत गेलेल्या या जिद्दी तरुणाने नोकरी करत स्वतःचा व्यवसाय उभा केला. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी प्रिंटिंग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्या मातीतले नाते कधी तुटू दिले नाही. समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची भावना अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे व   त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने पश्चिम भागाने विकासासाठी झटणारा दूरदर्शी नेता, समाजाने सेवाभावी कार्यकर्ता आणि अनेकांनी आधारवड गमावला आहे.

"शेठजी, तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आणि अजूनही शिकायचे होते. पण नियतीने तुमचा प्रवास अकाली थांबवला. जनतेसाठी अखंड परिश्रम करणाऱ्या या लोकनेत्याचा प्रवास आज कायमचा थांबला असला, तरी तुमची कार्यतत्परता, सेवाभाव आणि माणुसकीची शिकवण कायम स्मरणात राहील."

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !