जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन वारी संपेपर्यंत पंढरपुरातच ठाण मांडणार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर प्रतिनिधी (वैभव कुलकर्णी )
आषाढी वारी २०२६ साठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, लाखो वारकऱ्यांची सोय आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून पालखी मार्गाची पाहणी केली आहे. वारीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या दृष्टीने, १४ जुलैपासून वारी संपेपर्यंत आपण पंढरपूर येथेच मुक्कामी राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
पालखी मार्गाची पाहणी आणि कडक निर्देश
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी माळशिरस तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी केली. बोंडले, वेळापूर, माळशिरससह नातेपुते, अकलूज, बोरगाव आणि सदाशिवनगर येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगण ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या.
प्रशासनाला दिलेले प्रमुख निर्देश:
रस्ते व सुरक्षा: पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, महामार्गावर आवश्यक तिथे रम्बलर, गतिरोधक आणि क्रॅश बॅरियर्स बसवावेत.
आरोग्य व स्वच्छता: मुक्काम आणि विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे व स्नानगृहांची उभारणी तातडीने पूर्ण करावी. पालखीतळ व वारकरी सुविधा केंद्राचे सपाटीकरण करून तिथे स्वच्छता राखण्याचे आदेश दिले.
आपत्कालीन सज्जता: बोंडले, माळशिरससह इतर ठिकाणी 'इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर'चे (EOC) काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नियोजन व पारदर्शकता: जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीचा योग्य विनियोग करावा आणि सर्व कामांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रे ठेवण्याचे निर्देश दिले.
यंत्रणांना समन्वयाचे आवाहन
१९ व २० जुलै रोजी दोन्ही पालख्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर, "भाविकांना स्वच्छ पाणी, पुरेशी शौचालये आणि पालखी मार्गावर सोयीसुविधा मिळायलाच हव्यात," असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभाग प्रमुखांना आपापसात समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले आहे.
"आडचणी असल्यास थेट संपर्क साधा"
वारीकाळात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्वतःच्या मुक्कामाची घोषणा केली आहे. वारी संपेपर्यंत पंढरपुरातच उपस्थित राहून ते सर्व कामांवर लक्ष ठेवणार आहेत. "कोणालाही काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी किंवा माझ्याशी थेट संपर्क साधावा," अशा शब्दांत त्यांनी यंत्रणेला सतर्क केले आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पालखी सोहळ्याचे नोडल अधिकारी अमित माळी, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



