पाटी कोरी करून नवा इतिहास लिहिणार' - मुख्यमंत्री फडणवीस
शिवशाही वृत्तसेवा, मुंबई
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. कर्जमाफीनंतर आता राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप प्रदेश समितीच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
'शेतकऱ्यांची पाटी कोरी होणार'
शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत मुख्यमंत्री म्हणाले की, "शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहायचा आहे. बळीराजाच्या हितासाठीच आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे."
राजकारणापेक्षा शेतकरी हिताला प्राधान्य
कर्जमाफी आणि वीज बिल माफीच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्हाला केवळ राजकारण करायचे असते तर आम्ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा विचार केला असता. मात्र, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही. राजकारण करणे आमचे काम आहे, परंतु ते बळीराजाच्या जीवावर करणार नाही."
'हे देवाभाऊंचं सरकार आहे'
विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "अनेक विरोधकांना वाटत होते की कर्जमाफी आणि वीज बिलांच्या मुद्द्यावर त्यांचे राजकीय दुकान नेहमी सुरू राहील. पण त्यांना हे कदाचित माहित नसावे की हे 'देवाभाऊंचं' सरकार आहे; आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो."
'मी देखील शेतकरीपुत्र'
शहरातून निवडून आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत, असा टोला लगावणार्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित शेती असून आजही आमच्या शेतात धान पिकते. वयाच्या पंचवीशीपर्यंत मी शेतात राबलो आहे. मी खोलीत बसून निर्णय घेणारा नेता नाही, तर जमिनीवरचा संघर्ष मी स्वतः अनुभवला आहे."
या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझे कमी होणार असून, त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



