सायबर फसवणूक प्रतिबंध, रि-केवायसी आणि विविध कर्ज योजनांबाबत खातेदारांना मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फलटण तालुक्यातील गुणवरे शाखेच्या वतीने सहकार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित खातेदार व ग्रामस्थांना वाढत्या सायबर फसवणुकीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ओटीपी, बँक खात्याची गोपनीय माहिती अथवा इतर संवेदनशील तपशील देऊ नयेत, असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.
याशिवाय सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध कर्ज योजना, ठेवी व इतर बँकिंग सुविधांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खातेदारांनी रि-केवायसी व सी-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास बँकेचे अधिकारी, फलटण विभागाचे एफएलसी समन्वयक सचिन काळे, खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार यांनी केले, तर स्वागत विकास अधिकारी पोपट कुंभार यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



