मान्यवरांच्या हस्ते पंढरी नगरीमध्ये झाला गौरव
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (प्रतिनिधी जगदीश स्वामी)
परिमल सांस्कृतिक व्यासपीठ (रोपळे बु., ता. पंढरपूर) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात सोलापूर येथील साहित्यिक राजेंद्र भोसले यांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे
हॉटेल राधाकृष्णकराड रोड, पंढरपूर येथे आयोजित या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषद (पंढरपूर शाखा) चे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, तसेच आदर्श माता पुष्पलता निकम आणि परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या ३१ गुणवंत साहित्यिकांना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी वेगवेगळ्या श्रेणीत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सोलापूर येथील साहित्यिक राजेंद्र भोसले यांच्या 'परतीचा प्रवास' या कथासंग्रहाला 'कथा परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राजेंद्र भोसले यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करताना परिमलचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी संस्थेच्या साहित्यिक व सांस्कृतिक प्रवासाचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या लेखनाचा गौरव करत, अशा पुरस्कारांमुळे दर्जेदार साहित्याला व नव्या लेखकांना मोठी प्रेरणा मिळते, असा विश्वास व्यक्त केला. रवि वसंत सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, रसिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










