शाश्वत स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजना
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयांतर्गत पेयजल व स्वच्छता विभागाने ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 लागू केले असून हे नियम सर्व ग्रामपंचायत ने अंमलात आणावेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन 2026 नियमांचे काटेकोर पालन करून शाश्वत स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. प्रियाताई शिंदे यांनी केले आहे .
घनकचरा व्यवस्थापन नियम-2026 अंतर्गत घरपातळीवर ओला, सुका सॅनिटरी व विशेष कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच घराघरांतून कचरा संकलन, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण, प्लास्टिक कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास बंदी यांसारख्या प्रमुख तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी करणे तसेच पर्यटन व यात्रास्थळांसाठी विशेष स्वच्छता यंत्रणा उभारण्याचे निर्देशही नियमांमध्ये देण्यात आले आहेत.
बदलत्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या नव्या नियमांनुसार, जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातील कचऱ्याचे चार स्वतंत्र प्रकारांमध्ये वर्गीकरण करणे कायदेशीररीत्या बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम पाळणे आता प्रत्येकाला सक्तीचे राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा वर्गीकरण न करता एकत्र कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर थेट संबंधित ग्रामपंचायतीमार्फत कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या चार प्रकारांत वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले
ओला कचराः खरकटं अन्न, भाज्यांचे अवशेष.फळाच्या साली इ.
सुका कचराः कागद, पुठ्ठे प्लास्टिक, लोखंड, पत्रा रबर इ
सॅनिटरी कचराः सॅनिटरी पॅडस, डायपर्स, कंडोम इत्यादी.
विशेष हाताळणी कचरा: जुनी औषधं, इंजेक्शन सुया, खराब झालेले सेल, वायर्स, जुने बल्ब, ट्यूब, बंद मोबाईल, चार्जर इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी
मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन 2026 नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था व आस्थापनांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच
ग्रामपंचायतींनी ग्रामविकास आराखड्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश करून स्वच्छ व पर्यावरणपूरक गाव उभारणीसाठी लोकसहभागातून काम करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



