दि वाई अर्बन बँकेची ऐतिहासिक गरुडझेप - तब्बल ५ वर्षांनंतर वैधानिक लेखापरीक्षणात अ वर्ग प्राप्त

निव्वळ एनपीए ० टक्के राखण्यात व्यवस्थापनाला यश

Wai urban bank, audit a class, 0 NPA, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई येथील नामांकित 'दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने' आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या वैधानिक लेखापरीक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत 'अ' वर्ग मिळवला आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात बँकेने प्रथमच हा बहुमान मिळवला असून, बँकेचा निव्वळ एनपीए ० टक्के राखण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. बँक सलग दुसऱ्या वर्षी निव्वळ नफ्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कराड येथील मान्यताप्राप्त लेखापरीक्षक मे. एसएसएसएस अँड असोसिएटसचे सीए. शिरीष गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे लेखापरीक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष अनिल देव म्हणाले की, बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे व निकषांचे काटेकोर पालन केले आहे. आरबीआयच्या नियमानुसार हे प्रमाण १२% अपेक्षित असताना वाई अर्बन बँकेने ते १६.७०% इतके मजबूत राखले आहे. दि. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेकडे ५५७ कोटी रुपयांच्या ठेवी आणि ३२५ कोटी रुपयांची कर्जे असून बँकेचा संमिश्र व्यवसाय ८८२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच बँकेची गुंतवणूक ३३५ कोटी रुपये आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेला ४ कोटी ५६ लाख रुपये निव्वळ नफा झाला होता. तर सद्यस्थितीत संपलेल्या वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेला ३ कोटी ९६ लाख रुपये नफा झाला आहे. वास्तविक पाहता हा नफा ७.६५ कोटी रुपयांवर गेला असता; परंतु मध्य पूर्व देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्जरोख्यांच्या भावात घसरण झाली. परिणामी, आरबीआयच्या नियमांनुसार बँकेला ३.६९ कोटींची आर्थिक तरतूद करावी लागली. ही तरतूद करावी लागली नसती, तर बँकेचा निव्वळ नफा ऐतिहासिक ठरला असता. बँकेच्या या यशात थकीत कर्ज वसुली व व्यवसाय वाढीसाठी बँकेचे पालक अधिकारी तथा सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक जे. पी. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

बँकेने आगामी काळासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली आहेत. यामध्ये प्रामुख्याने बँकेचे नेटवर्थ ५० कोटींपेक्षा जास्त करून ग्राहकांसाठी युपीआय सारखी आधुनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. चालू आर्थिक वर्षात जुना ४० कोटींचा एनपीए वसूल करून मागील तोटा पूर्णपणे भरून काढण्यात येणार आहे. बाजारातील इतर बँकांच्या तुलनेत बँकेने सर्व कर्ज योजनांचे व्याजदर अत्यंत स्पर्धात्मक व कमी केले असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात ठेवी आणि कर्जाचा एकूण संमिश्र व्यवसाय १,००० कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे. 

दरम्यान, येत्या रविवारी दि. २१ जून २०२६ रोजी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्त बँकेत 'कॉफी पान' कार्यक्रमासोबतच, सामाजिक बांधिलकी म्हणून वाईतील 'बेल एअर हॉस्पिटल'च्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, ॲड. बाळकृष्ण पंडित, रमेश ओसवाल, महेश राजेमहाडिक, मकरंद मुळये, काशीनाथ शेलार, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, ॲड. सुनीत्री गोवित्रीकर, नगरसेविका ज्योती गांधी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, सरव्यवस्थापक संतोष बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !