२५० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण; तीन वर्षांत ९०० युवक-युवतींना प्रशिक्षण
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
"गरवारे युवा विकास केंद्र हा केवळ एक प्रशिक्षण प्रकल्प नसून ग्रामीण भागातील युवक-युवतींच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा आशेचा दीपस्तंभ आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महान कार्य येथे सुरू आहे. आज अनेक प्रशिक्षणार्थी स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आणि समाधान देणारी आहे," असे गौरवोद्गार गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडचे संचालक श्रीनिवास कुलकर्णी यांनी काढले.
गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या गरवारे युवा विकास केंद्राच्या वार्षिक प्रमाणपत्र वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक देशपांडे तसेच सेवा सहयोग संस्थेच्या कविता साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले, "स्वावलंबन हा विकासाचा खरा पाया आहे. वाईच्या ऐतिहासिक भूमीत आणि परिसरातील ग्रामीण भागातील मातीत संस्कारित झालेले हे युवक-युवती जेव्हा स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वबळावर आणि स्वाभिमानाने उभे राहतात, तेव्हा हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो समाजपरिवर्तनाची चळवळ बनतो. ही स्वावलंबनाची ज्ञानगंगा अशीच अविरत वाहत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे."
ते पुढे म्हणाले, "कोणतीही भव्य इमारत भक्कम पायाशिवाय उभी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे हा ज्ञानयज्ञ यशस्वीपणे चालविण्यासाठी पडद्यामागे राहून कार्य करणाऱ्या सर्व समन्वयक, प्रशिक्षक आणि कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच अनेक तरुणांचे आयुष्य घडत आहे."
यावेळी बोलताना विवेक कुलकर्णी यांनी केंद्राच्या तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, "गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडने सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने एप्रिल २०२३ मध्ये सुरू केलेले गरवारे युवा विकास केंद्र आज यशस्वीपणे तीन वर्षे पूर्ण करत आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख तसेच स्वयंरोजगारासाठी उपयुक्त असे विविध कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत."
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत ९०० हून अधिक युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे. त्यापैकी सुमारे १०० जणांना विविध क्षेत्रांत रोजगार मिळाला असूनसुद्धा ते१०० हून अधिक युवक-युवतींनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. सेवा सहयोग संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन या उपक्रमाची माहिती पोहोचवून अधिकाधिक युवक-युवतींना या चळवळीशी जोडण्याचे मोलाचे काम केले आहे. भविष्यातही नवीन अभ्यासक्रम सुरू करून अधिकाधिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात फोटोग्राफी, टॅली, सीएनसी ऑपरेटर, ब्युटी पार्लर आणि जेंट्स पार्लर या विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५० हून अधिक प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. गेल्या वर्षभरात या केंद्रामार्फत २५० पेक्षा अधिक युवक-युवतींना विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दिपाली शिंदे, निकिता पार्टे आणि स्नेहल घाडगे यांनी गरवारे युवा विकास केंद्राच्या कार्यावर आधारित प्रभावी लघुनाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कौशल्याची झलक पाहायला मिळाली. उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी करून प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले.
पूजा सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अक्षय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. चंदन देशमुख, श्रीनिवास जमदाडे आणि चेतन जायगुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सेवा सहयोग संस्थेच्या कविता साठे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



