पश्चिम भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपघातांचा धोका वाढला

नागरिकांमध्ये तीव्र संताप

Road condition is very bad, causes accident, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

पावसाळ्याच्या तोंडावर वाई तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारांची सफाई न झाल्याने, साईड पट्ट्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण न झाल्याने आणि पाण्याच्या निचऱ्याच्या कोणत्याही उपाययोजना न केल्याने थोड्याशा पावसातही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. परिणामी डोंगर उतारावरील माती, वाळू व दगड राडारोडा रस्त्यावर येत असून मोठ्या अपघातांची भीती निर्माण झाली आहे.

पश्चिम भाग हा अतिवृष्टीसाठी ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने यंदा कोणतीही पूर्वतयारी केलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यालगतच्या गटारी गाळाने व मातीने पूर्णपणे बुजल्या असून अनेक ठिकाणी पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यांचा भराव वाहून जाऊन वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, सिद्धनाथवाडी ते एक्सर या मार्गावर तब्बल १५ स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत. मात्र या स्पीड ब्रेकरवर आवश्यक असलेले पांढरे पट्टे, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक लावण्यात आलेले नाहीत. रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात हे स्पीड ब्रेकर वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. हे स्पीड ब्रेकर कोणत्या निकषांवर आणि कोणाच्या आदेशाने टाकण्यात आले, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. धोम परिसरातील चढ-उताराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू व माती वाहून आल्याने तेथेही गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर मेणवली परिसरात गटारी पूर्णपणे तुंबल्या असून रस्त्यावर मातीचा थर साचला आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वाकून थेट रस्त्यावर आल्या आहेत. मात्र संबंधित विभागाने त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन ते अडीच महिन्यांत पश्चिम भागातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातांत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतापाची लाट उसळली आहे. "अपघात होण्याची वाट पाहूनच विभाग जागा होणार का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. निवडणुकीच्या काळात पश्चिम भागातील जनतेसमोर आश्वासनांची खैरात करणारे लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांना या गंभीर समस्यांचे भान का येत नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील साटेलोटेमुळे विकासकामांचा दर्जा घसरला असून "आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, भविष्यात या निष्काळजीपणामुळे एखादा मोठा अपघात घडून जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी आणि जबाबदार यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डोळे उघडून कारवाई करावी, अन्यथा पश्चिम भागातील जनतेचा उद्रेक अटळ असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

पश्चिम भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ गटारांची सफाई, साईड पट्ट्यांची दुरुस्ती, रिफ्लेक्टर बसविणे, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि रस्त्यावरील माती-वाळू हटविण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही आसरे गावचे रहिवासी सागर सणस यांच्याकडून  देण्यात आला आहे

पश्चिम भागातील अनेक युवक नागरिक मोठ्या प्रमाणात वाई येथे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी व आपल्या उपजीविकेसाठी वाई शहरांमध्ये एमआयडीसी परिसरामध्ये कामासाठी ये जा करतात परंतु या रस्त्याला कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर अनेक ओढ्यावरच्या पुलांवरती कसलेही कठडे नाहीत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेची गटरे उखरलेली नाहीत ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येत नाही का असा सवाल वाई तालुक्यातील धरणाच्या टोकाला वसलेल्या वासोळे येथील राम दाणवले या नागरिकांनी केला आहे

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !