नोडल अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांचे निर्देश
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी )
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे आणि समन्वयाने पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले. आगामी निवडणूक शांततामय आणि यशस्वी वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन आणि निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कामकाजाचे नियोजन व दक्षता
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र असणार असून, सर्व सहा ठिकाणांचे वेबकास्टिंग जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून केले जाईल. एफएसटी (FST), व्हीएसटी (VST) आणि एसएसटी (SST) पथकांनी अत्यंत कार्यक्षमतेने काम करावे. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचारी प्रशिक्षण, सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती आणि जिल्हाधिकारी कार्यालयात चोवीस तास सक्रिय कॉल सेंटर सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलीस विभागाने शस्त्रे जमा करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि चेक पोस्टवर बारकाईने तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यावर भर दिला. ते म्हणाले, "सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी एकूण ६१६ मतदार असून, १८ जून रोजी सहा केंद्रांवर मतदान होणार आहे. सर्व मतदारांना आणि राजकीय प्रतिनिधींना त्यांच्या मतदान केंद्रांबाबत पूर्वकल्पना द्यावी. तसेच, मतदार यादीतील मयत मतदारांची खातरजमा करून ती अद्ययावत करावी." प्रलोभन किंवा जबरदस्तीच्या तक्रारी आल्यास पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करावी आणि मतदान व स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी या निवडणुकीसाठी एकूण २८ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येकावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामार्फत आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









