रवी बोडके यांचा विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पश्चिम महाराष्ट्रात गेली १७ वर्षे अनाथ, बेघर, निराधार आणि मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांची मानसिक आरोग्य मंडळ (MHRB) वर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रवी बोडके हे यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. वाई तालुक्यातील वेळे येथे त्यांनी निराधार, अनाथ व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी आश्रम उभारला असून, शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय शेकडो गरजूंचा सांभाळ केला जात आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक निराधारांना नवजीवन मिळाले आहे.
राज्य शासनाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार मानसिक आरोग्य मंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने नामनिर्देशन प्रक्रिया व मुलाखती घेतल्यानंतर मानसिक आजारी व्यक्तींची काळजी घेणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून रवी बोडके यांची निवड केली.
समाजातील वंचित, निराधार आणि मानसिक रुग्णांच्या पुनर्वसनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही दखल मानली जात असून, त्यांच्या निवडीमुळे मानसिक आरोग्य क्षेत्रातील प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रवी बोडके यांच्या या यशाबद्दल सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच विविध स्वयंसेवी संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याला नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









