मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई विधानसभा मतदारसंघातील सिंचन आणि जलसंपदेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत मतदारसंघातील विविध प्रलंबित पाणी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. वाई मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
कवठे व केंजळ उपसा सिंचन योजना या दोन्ही महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजनांची अपूर्ण राहिलेली कामे प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. जललक्ष्मी प्रवाही जल योजनेची तातडीने आवश्यक ती दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत चर्चा झाली. जललक्ष्मी टप्पा क्र. २ अंतर्गत जांभळी खोऱ्यातील गावांच्या शेतीसाठी हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभापासून आजवर वंचित राहिलेल्या खंडाळा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. Tasech खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी येथील उपसा सिंचन योजनांचे रखडलेले प्रश्न सोडवून या भागातील शेतीला पाणी देण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीत मतदारसंघातील प्रत्येक योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रलंबित प्रश्न वेळेत मार्गी लावण्यासाठी सकारात्मकता दर्शवली असून, कामाला गती देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वाई, खंडाळा भागातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा









