सीट बेल्टमुळे मोठी दुर्घटना टळली
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाबळेश्वरहून तेलंगणाकडे परत जात असताना पाचगणी घाटात एका कारचा अपघात होऊन महिला व लहान मूल जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या वाजणाच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील सैनिकपूर येथील रहिवासी सबूजित रॉय हे आपल्या कुटुंबासह निसान कंपनीच्या (क्रमांक TS 07 JT 8806) कारमधून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आले होते. महाबळेश्वरहून परतीचा प्रवास सुरू असताना पाचगणी घाटातील बुवासाहेब मंदिराजवळ त्यांच्या कारचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रसंगावधान राखत रॉय यांनी वाहन तातडीने उजव्या बाजूला वळवले. मात्र नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या डोंगरातील दगडावर जोरात आदळली. अपघातावेळी कारमध्ये सबूजित रॉय, त्यांची पत्नी आणि लहान मूल प्रवास करत होते.
कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने अपघातानंतर वाहनातील एअरबॅग्स तत्काळ उघडल्या. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र रॉय यांच्या पत्नी व मुलाला दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वाई येथील बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, सीट बेल्टचा वापर आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य गंभीर दुर्घटना टळली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



