बाळासाहेबांची रणनीती विरुद्ध घराणेशाहीचा अतिरेक
1991 पासून 2022 पर्यंतच्या 31 वर्षात शिवसेनेत चार मोठे बंड झाले. त्यातील पहिले बंडखोर छगन भुजबळ काँग्रेसमार्गे राष्ट्रवादीत स्थिरावले, नारायण राणेही काँग्रेसमार्गेच भाजपावासी झाले आणि राज ठाकरे घराण्याचा वारसा दाखवू शकले नाही. त्यामुळे हे तीनही व्हीआयपी 'गद्दार' शिवसेनेचं फार काही बिघडवू शकले नाही. याकाळात भाजपाच्या सोबतीचा मोठा आधारही शिवसेनेला होता, त्यामुळे ते तरून गेले. एकनाथ शिंदे यांनी मात्र एकामागून एक असे धक्के दिले की, ठाकरेंची शिवसेना गळपटून गेली. ऐन साठाव्या वर्धापनदिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पद सोडण्याची भाषा पुन्हा करावी लागली. यावरून "जोरका झटका धीरेसे" देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावं लागेल. आज चार वर्षानंतर ही स्थिती आहे की, ठाकरेंची शिवसेना ताब्यात घेऊन शिंदे ए टीम म्हणून मिरवत आहेत आणि ठाकरेंचे वारस मात्र मशाल हाती घेऊन अंधारात चाचपडत आहेत. या घराणेशाहीच्या हाती बी टीमचा फलक आला आहे. आणि, ए-बी मध्ये तुलनाच होऊ शकत नाही इतकं अंतर पडलेलं आहे.
भुजबळ, राणे आणि राज हे तिघेही शिवसेनाप्रमुखांचे खास होते आणि त्यांना शिवसेनेत वरचा दर्जा होता. 'उबाठाराज' सुरू व्हायच्या आत त्यांची प्रकरणं घडली आणि बाळासाहेबांनी ती स्वत:च्या पद्धतीनं हाताळून पक्षाचं कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी घेतली. सारा खेळ बिघडला तो उबाठाचं नेतृत्व लागू झाल्यापासून. शिवसेना म्हणजे फक्त ठाकरे हा अहंकार त्यांनी इतका वाढवला की, खुद्द शिवसेनेतच धुसफुस सुरू झाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजपाशी असलेली युतीच तोडून टाकली. निकाल काय लागला ? तर, भाजपाला स्वबळावर 122 जागा अन् शिवसेनेला 63 म्हणजे अर्ध्याच जागा. 2019 मध्येही भाजपा 105, शिवसेना 56. म्हणजे दोन्ही वेळी 2 : 1 असं प्रमाण. कोणता पक्ष मोठा किंवा युतीत कोण मोठा भाऊ, हे मतदारांनी लागोपाठ दोनदा स्पष्टपणे दाखवून दिलं. ते मान्य करून राहिले असते तर शिवसेनेची शान राहिली असती आणि ते सलग तिसऱ्यादा सत्तेत राहिले असते. हा सन्मानजनक पर्याय स्वीकारणं सोडून 2014 मध्ये उबाठानं महिनाभरातच नांगी टाकली आणि देवेन्द्र सरकारमध्ये मंत्रिपदं मिळवली. आतातरी एकनिष्ठ राहावं की नाही ? तेही नाही. सतत सरकारविरोधी भूमिका घेत राहायचं आणि त्यासाठी सामना वृत्तपत्राचा वापर करायचा, हा उलटा धंदा त्यांनी सुरू केला. (संजय राजाराम राऊत यांच्या डोक्यातील कारस्थानाची ही सुरुवात होती.)
2019 मध्ये तर उबाठा-संरारा या जोडीनं कहरच केला. निवडणूक निकालानंतर भाजपासोबतची युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या परंपरागत विरोधकांशी घरठाव केला. याच बेईमानीची किंमत ते आज सात वर्षानंतरही मोजत आहेत. भाजपानं अडीचच वर्षात एकनाथ शिंदेंसारखा मोठा मासा गळाला लावून केलेल्या पलटवाराची खोल जखम सुकायची असतानाच चार वर्षात खासदारांच्या 'गद्दारी'ला सामोरं जाण्याची वेळ पुन्हा उबाठावर आली अन् आमदारही त्याच मार्गानं जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तसं झाल्यास शिवसेनेचं आपलं दुकान बसतं, हे लक्षात आल्यानंच पक्षप्रमुखपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव पुन्हा ठेवला गेला, हे कोणताही राजकीय अभ्यासक सांगेल. त्यातही शेपूट वाकडंच आहे. म्हणे- "आम्ही सोबत होतो म्हणूनच भाजपा मोठा झाला, महाराष्ट्रभर पसरला." भरलेल्या गाड्याखालून चालणाऱ्या कुत्र्याला वाटत राहतं "मीच गाडा पुढं नेत आहे !" तीच ही स्थिती. तसं असेल तर 2014 मध्ये स्वतंत्र लढून तुम्हाला भाजपाच्या तुलनेत अर्ध्याच जागा का मिळाल्या ? नाही जास्त तर बरोबर तरी मिळायला हव्या होत्या. याचा अर्थ "आमच्यामुळे भाजपा" हा दावा फोल आहे. "भाजपासोबत आम्ही" हे मान्य करून राहिले असते तर पुढचं सगळं महाभारत टळलं असतं.
पण, अहंकार जात नाही. परवाच्या 60 व्या वर्धापनदिन कार्यक्रमातही तेच तुणतुणं- भाजपानं आमचा आणि महाराष्ट्राचा विश्वासघात केला. लेकिन पब्लिक सब जानती है। मित्रपक्षाचा, स्वपक्षीय नेत्यांचा विश्वासघात कोणी केला, असंगाशी संग करून मुख्यमंत्रिपद पदरात कोणी पाडून घेतलं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवीन असं खोटं आश्वासन जनतेला कोणी दिलं, स्वत:च्या मुलाला मंत्री बनवून धुमाकूळ कोणी घातला हे सारं शिवसैनिकांना आता पुरतं ठावूक झालं आहे. म्हणूनच ते एकामागून एक एकनाथ शिंदेंचे हात मजबूत करीत आहेत. शिवसैनिक मुख्यमंत्री (आणि आता उपमुख्यमंत्री) ही शिंदेंची प्रतिमा घराणेशाहीच्या अहंकारावर भारी पडत आहे. आपल्या बी टीमचं नेतृत्व कडव्या शिवसैनिकाकडे सोपवलं आणि कर्णकर्कश, वाचाळ भोंगे कायमचे बंद केले तरच हे थांबेल. नाहीतर बी ची सी... डी... ई... टीम व्हायला वेळ लागणार नाही. "साठी बुद्धी नाठी" करू नका, हाच षष्ट्यब्दिपूर्तीचा उबाठा गटासाठी खरा संदेश म्हणायचा.
अतिथी संपादक
विनोद देशमुख, नागपूर
(राजकीय विश्लेषक)
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



