महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - योग, प्राणायाम आणि निरोगी आरोग्याचा दिला संदेश
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त शिरूर येथे 'ओन्ली वुमन्स जिम' आणि 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' (प्रितम प्रकाश नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमाला शहरातील महिला व नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रसंगी उपस्थितांनी योग, प्राणायाम करत दैनंदिन जीवनात निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.
लोकोपयोगी उपक्रमांची सातत्याने गरज : प्रिया बिरादार
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांचे कौतुक करताना वुमन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांनी, "अशा आरोग्यदायी आणि सामाजिक हिताच्या उपक्रमांची समाजाला पुढेही सातत्याने गरज आहे," असे मत व्यक्त केले.
योग ही एक जीवनपद्धती : योगी आचार्य गोपेश बह्मपुरीकर
या कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योगाचे महत्त्व अनुभवले. योगी आचार्य गोपेश बह्मपुरीकर यांनी उपस्थितांना योग साधना व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी कशा आत्मसात कराव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. "योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी एक उत्तम जीवनपद्धती आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. सहभागी नागरिकांनी विविध योगासनांचा सराव करत निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प केला.
मान्यवरांची मांदियाळी
या कार्यक्रमास शिरूर पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अल्पसंख्याक महिला विभागाच्या रेश्मा शेख, ज्येष्ठ पत्रकार सतीश धुमाळ, सुदर्शन दरेकर, अर्जुन बढे, राजू शेख, भाजपाचे माजी शिरूर शहराध्यक्ष केशव लोखंडे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित डोंगरे, निलेश नवले, विजय नरके, हुसेन शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, हरीश शर्मा आणि वुमन्स जिमच्या सर्व ट्रेनर्स उपस्थित होत्या.
विशेष सहकार्य व आभार
प्रितम प्रकाश नगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, सकारात्मकता, सामाजिक एकात्मता आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश समाजात पोहोचवण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार सुजाता पाटील यांनी मानले.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



