सेवागौरव समारंभ उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बावधन हायस्कूल, बावधन येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रसाद वामन पिसाळ हे ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि समर्पित सेवेनंतर दि. २० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सेवागौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी त्यांच्या संस्थेप्रती असलेल्या निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सेवेला मानाचा मुजरा करण्यात आला.
प्रसाद पिसाळ यांनी आपल्या सेवाकाळात वाघजाईवाडी, अरवडे आणि बावधन येथे कार्यरत राहून संस्थेच्या कामकाजात मोलाचे योगदान दिले. शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. संस्थेच्या प्रगतीत आणि शाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय राहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन भोसले पाटील होते. यावेळी उपसरपंच उदयसिंह पिसाळ, माजी मुख्याध्यापक सी. के. जगताप, मुख्याध्यापक एस. आर. लोहार (क्षेत्र माहुली), माजी मुख्याध्यापक पी. आर. पाटील, कवी सुरेश पाटील, चित्रपट अभिनेते तथा राष्ट्रसेवा दलाचे वाई तालुका अध्यक्ष दत्तात्रय महांगडे (बापू) तसेच बावधन येथील ग्रामस्थ आणि अरवडे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रसाद पिसाळ यांच्या सेवाभावी वृत्ती, संस्थेप्रती असलेली निष्ठा आणि कर्तव्यपरायण कार्यशैलीचा गौरव केला. सेवानिवृत्ती हा सेवाप्रवासाचा शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पिसाळ यांनी केले, तर मनोगत मुनीर खाटीक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन मुख्याध्यापक एम. ए. मुकादम यांनी केले.
यावेळी प्रसाद पिसाळ यांचे बंधू, उद्योजक तथा रजनी ॲग्रो, वाईचे मालक महेश पिसाळ, जयश्री जाधव तसेच पिसाळ कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी प्रसाद पिसाळ यांना निरोगी, आनंदी आणि समाधानमय निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



