प्राणीमित्र, वनविभाग आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पक्ष्याचा जीव वाचला
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई येथील भाजीमंडई भागातील सातारा जिल्हा बँकेशेजारी असलेल्या एका झाडावर प्रतिबंधित चायनीज पतंगाच्या मांजात अडकलेल्या एका दुर्मिळ 'गव्हाणी' जातीच्या घुबडाला स्थानिक नागरिक, प्राणीमित्र आणि वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे जीवदान मिळाले आहे.
४ जून रोजी भाजीमंडई परिसरातून जात असताना विजय सुतार यांना जिल्हा बँकेशेजारील झाडावर एक घुबड मांजामध्ये गंभीररीत्या अडकल्याचे दिसून आले. मांजा पंखात आणि पायात रुतल्यामुळे ते असहाय्य होऊन सुटकेसाठी धडपडत होते. सुतार यांनी वेळ न घालवता तातडीने स्थानिक सर्पमित्र आणि वनविभागाला याची कल्पना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र व प्राणीमित्र अंकुश पवार, प्रशांत डोंगरे, सौरभ कासार, अजीज शेख, नगरसेवक अजित शिंदे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, अनिकेत गुजर आणि राहीन शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाड उंच असल्याने पक्ष्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. अखेर वाई वनविभागाचे संग्राम मोरे, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन या घुबडाला मांजा कापून सुखरूप खाली उतरवले.
खाली उतरवल्यानंतर घुबडाला मांजापासून पूर्णपणे मुक्त करण्यात आले. डॉ. प्रशांत सूर्यवंशी व प्राणीमित्रांनी त्याच्यावर आवश्यक ते प्रथमोपचार केले. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर, वनविभागाच्या उपस्थितीत त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
या घटनेमुळे वाई शहरात प्रतिबंधित चायनीज मांजाच्या छुप्या विक्री आणि वापराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. निष्पाप पक्ष्यांचा जीव घेणाऱ्या या जीवघेण्या मांजावर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्राणीमित्रांनी केली आहे. वेळीच मदत करणाऱ्या सर्व नागरिकांचे व रेस्क्यू टीमचे सध्या वाई शहरात कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



