विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार यांचे निवेदन
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषद प्रशासनामार्फत नुकत्याच राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या व टपऱ्या संबंधितांना कोणताही दंड किंवा शुल्क न आकारता तात्काळ परत देण्यात याव्यात तसेच सर्व हातगाडी व टपरीधारक विक्रेत्यांसाठी नगरपरिषदेच्या वतीने योग्य व नियोजित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये शहरातील अनेक हातगाड्या व टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या हातगाड्या व टपऱ्या अनेक गरीब व सर्वसामान्य कुटुंबांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्याने या कारवाईमुळे संबंधित कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक कुटुंबांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, कारवाईपूर्वी संबंधित विक्रेत्यांना पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याची तसेच त्यांच्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली नसल्याची बाबही निवेदनात मांडण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करून जप्त करण्यात आलेल्या सर्व हातगाड्या व टपऱ्या संबंधितांना कोणताही दंड अथवा शुल्क न आकारता तात्काळ परत देण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक निलेश पवार यांनी केली आहे. तसेच शहरातील सर्व हातगाडी व टपरीधारक विक्रेत्यांसाठी नगरपरिषदेच्या वतीने योग्य, नियोजित व कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पर्यायी जागेची व्यवस्था झाल्यास विक्रेत्यांना पुन्हा रस्त्याच्या कडेला किंवा फुटपाथवर व्यवसाय करण्याची वेळ येणार नाही. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहील आणि विक्रेत्यांच्या उपजीविकेचाही प्रश्न मार्गी लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या उपजीविकेचा विचार करून नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी प्रितीम पाटील यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक निलेश पवार यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना निवेदन सादर केले. या प्रसंगी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, सागर नरवडे तसेच नगरसेविका सुनिता भुजबळ उपस्थित होत्या.
“गरीबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार”
अतिक्रमण हटाव कारवाईनंतर उपजीविकेपासून वंचित झालेल्या हातगाडी व टपरीधारक विक्रेत्यांना दिलासा मिळावा, त्यांच्या रोजगाराचे संरक्षण व्हावे आणि शहरातील वाहतूक व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने नगरसेवक निलेश पवार यांनी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्याकडे निवेदन सादर करून दंडाशिवाय हातगाड्या व टपऱ्या परत देण्यासह पर्यायी जागेची मागणी केली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



