कराड पोलिसांकडून १२ तासांत गुन्ह्याचा पर्दाफाश
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
कराड येथील सुपर मार्केट परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोरील रस्त्यावर घडलेला अपघात नसून पत्नी व मेहुण्यानेच केलेला घात असल्याचे पोलिसांनी १२ तासात उघडकीस आणले.
शहरात शनिवारी पहाटे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोर घडलेल्या अपघातामागे थरारक खुनाचे षड्यंत्र असल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभागातील अभियंत्याच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या खुनामागे मृताची पत्नी व मेहुणा असल्याचे निष्पन्न झाले असून, पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४, रा. मनव, ता. कराड) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय ३६) आणि मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय ४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुपारी घेणाऱ्या अन्य आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी कराड शहर पोलिसांची तीन व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मण मंडले व त्यांची पत्नी सुरेखा यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. या वादातूनच सुरेखा हिने आपल्या भावाच्या मदतीने सुमारे महिनाभरापूर्वी पतीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी मुंबई येथे जाऊन काही व्यक्तींशी संपर्क साधून सुपारी देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल समोरील शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीस चारचाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुरुवातीला मृताच्या पत्नीने ही घटना अपघात असल्याचे सांगितले. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान एक अल्टो कार मंडले यांच्या पाठीमागून येऊन त्यांना जोरदार धडक दिल्याचे निष्पन्न झाले. धडक दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग व अन्य साहित्य घेऊन पलायन केले. विशेष म्हणजे, काही वेळाने तीच कार पुन्हा घटनास्थळी परतली आणि रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालून त्यांचा खून करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा बदलली. संशयाच्या आधारे मृताची पत्नी सुरेखा मंडले हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीदरम्यान तिने भावाच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी पत्नी व मेहुण्यास अटक केली असून सुपारी घेणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



