ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्याची तक्रार, जबरदस्ती केल्यास MERC व पोलिसांकडे दाद मागण्याचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वाई शहरात विरोधाचा सूर उमटू लागला आहे. वाई येथील रहिवासी तसेच ग्राहक संरक्षण परिषद, सातारा जिल्ह्याचे सदस्य दादासाहेब तुकाराम काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत आपल्या परिसरात स्मार्ट मीटर बसविण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
महावितरणकडून १३ जून २०२६ रोजी एसएमएसद्वारे ४८ तासांची पूर्वसूचना देण्यात आल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर, नियमबाह्य व ग्राहकांच्या हिताला बाधा आणणारी असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
निवेदनात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाची अधिसूचना ही केवळ धोरणात्मक असून ग्राहकांवर सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा अधिकार देत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयातील एका याचिकेचा संदर्भ देत ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे अयोग्य असल्याचे नमूद केले आहे.
याशिवाय सध्या सुरू असलेले पारंपरिक वीजमीटर बीआयएस प्रमाणित असून व्यवस्थित कार्यरत असल्याने ते बदलण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. MERC वीज पुरवठा संहितेनुसार मीटर बदलासाठी किमान १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना आवश्यक असताना केवळ एसएमएसद्वारे ४८ तासांची नोटीस देणे ग्राह्य धरता येणार नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे.
स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिलांच्या तक्रारी देशभरातून समोर आल्याचा दावा करत ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आपल्या लेखी परवानगीशिवाय मीटर बदलण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC), ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच संबंधित पोलिस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा काळे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
या निवेदनामुळे वाई शहरात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



