कानोबा मंदिर परिसरातील अतिक्रमणांवरही कारवाई करा; लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांची मागणी...!
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
शिरूर नगरपरिषदे कडून शहरात राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. अतिक्रमण कारवाईमध्ये दुजाभाव होत असून गरीब व हातावर पोट असलेल्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात असताना प्रभावशाली व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींच्या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहरातील अनेक छोट्या व्यावसायिकांच्या हातगाड्या, टपऱ्या आणि उपजीविकेची साधने हटविण्यात आली. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र दुसरीकडे काही प्रभावशाली व्यक्ती व व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांवर अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे कानोबा मंदिर परिसरात अनेक वर्षांपासून अतिक्रमणे अस्तित्वात असून याबाबत वारंवार तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून सर्वांसाठी समान न्याय हा केवळ कागदोपत्रीच राहिला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अतिक्रमण हटाव कारवाईबाबत सामान्य नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्वांवर समान व सरसकट कारवाई करण्याची मागणी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काही नागरिकांनी आपल्या अडचणी व उपजीविकेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी दमदाटीची व अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांशी सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने संवाद साधणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या घटना अत्यंत खेदजनक असल्याचे जोगदंड यांनी म्हटले आहे. प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, कानोबा मंदिर परिसरातील प्रलंबित अतिक्रमणांवर तात्काळ कार्यवाही करावी तसेच नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे.
"कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. गरीबांवर कारवाई आणि प्रभावशालींना मोकळीक, अशी भूमिका लोकशाही व्यवस्थेला शोभणारी नाही. प्रशासनाने निष्पक्षपणे काम करून सर्वांना समान न्याय द्यावा," असे विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी निवेदनात म्हटले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



