१०८ बालकांचा सहभाग; भावी सुज्ञ नागरिक घडवण्यासाठी प्रभागातील स्तुत्य उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा,शिरूर (प्रतिनिधी, फैजल पठाण)
शहरातील प्रभाग क्र. २ मध्ये १ जून ते ७ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेले सात दिवशीय 'बाल संस्कार शिबीर' अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाले. 'नगरसेविका स्वप्नालीताई योगेश जामदार मित्र मंडळा'च्या वतीने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विविध कला, क्रीडा आणि मूल्यांचे प्रशिक्षण घेऊन प्रगत झालेल्या १०८ बालकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विविध विषयांचे तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
या सात दिवसांच्या कालावधीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश होता:
संस्कार व आरोग्य संवाद: 'शिरूर संवादिनी'च्या वतीने लहान मुलांसाठी श्लोक, प्रार्थना, स्तोत्र आणि 'गुड टच-बॅड टच' विषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली.
योग व सूर्यनमस्कार: योगगुरू विनायक पोटे व लोखंडे सर यांनी मुलांकडून योगासने आणि सूर्यनमस्कार करून घेतले.
आत्मसंरक्षण: सुदाम राखूडे सर यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्राथमिक धडे व प्रशिक्षण दिले.
कला व कौशल्य: संदीप वेताळ सर यांनी चित्रकला व हस्ताक्षर सुधारणेचे वर्ग घेतले, तर प्रतिभा पुजारी मॅडम यांनी अबॅकसचे प्रशिक्षण दिले.
संगीत साधना:'ओंकार संगीत विद्यालय, शिरूर' यांच्या वतीने मुलांना तबला व पेटी वादनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले.
आरोग्य तपासणी:डॉ. मोनिका धापटे-धुमाळ यांनी मुलांची दात तपासणी, तर डॉ. साळुंके सर यांनी डोळे तपासणी शिबीर यशस्वीपणे पार पाडले.
पालकांच्या आचरणातूनच मुले घडतील: मान्यवरांचे मत
शिबिराच्या सांगता समारंभाप्रसंगी शहरातील अनेक मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे म्हणाल्या, "आजच्या काळात अशा बाल संस्कार शिबिरांची समाजात मोठी गरज आहे. नगरपालिकेत नवीन बॉडी निवडून आल्यापासूनच्या गेल्या पाच महिन्यांतील हा सर्वात उपयुक्त आणि कौतुकास्पद कार्यक्रम वार्ड क्र. २ मध्ये घेण्यात आला आहे."
ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र धनक सर यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, "मुलांमध्ये चांगले संस्कार रुजावे असे वाटत असेल, तर सर्वात आधी पालकांनी आपले स्वतःचे आचरण सुधारणे गरजेचे आहे. मुले पालकांचेच अनुकरण करत असतात."
तर सभापती डॉ. सुनिताताई पोटे यांनी आयोजकांचे अभिनंदन करत, भावी युवा शक्ती घडवण्याचा हा उद्देश नक्की यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक अमोल चव्हाण
यांनी असे संस्कार शिबीर शहरातल्या प्रत्येक वॉर्डमध्ये राबवले जावे अशी इच्छा व्यक्त केली, तर नगरसेवक गणेश कोळपकर यांनीही आपल्या भाषणातून शिबिराचे महत्त्व पटवून देत आयोजकांचे कौतुक केले.
विशेष सहकार्य आणि खाऊ वाटप
या सातही दिवसांच्या शिबिरात सहभागी मुलांना रोज मच्छिन्द्रशेठ जामदार यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात येत होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन जामदार, भरत कालेवार, विजय शिर्के, सागर शिर्के, संजय कडेकर, राजेंद्र गोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पुढील नियोजन
प्रभागातील बालकांवर झालेले हे संस्कार खंडित होऊ नयेत, यासाठी यापुढे देखील प्रत्येक रविवारी बाल संस्कार वर्ग चालू ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती योगेश जामदार यांनी या वेळी दिली.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. वैशालीताई साखरे यांनी केले, योगेश जामदार यांनी प्रास्ताविक मांडले, तर उपस्थितांचे आभार नगरसेविका स्वप्नालीताई योगेश जामदार यांनी मानले. या प्रसंगी पाटील मॅडम, डॉ. वैशाली साखरे, लोखंडे मॅडम, शशिकला काळे यांसह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



