टेम्पोच्या धडकेत महिला गंभीर जखमी महिलेचे दोन्ही पाय निकामी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईज येथून देगाव येथे जाणा-या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि. ८ जून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात श्रीमती प्राजक्ता नंदकुमार महानवर वय ४० रा. लगडवाडी ता. वाई या गंभीर जखमी झाल्या असून पायावरून टेम्पो चे चाक गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर टेम्पो चालक प्रवीण नामदेव पोळ वय ५० हे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, लगडवाडी ता. वाई येथील प्राजक्ता नंदकुमार महानवर या दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास देगाव फाट्यावरून फोनवर बोलत जात असताना पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पो क्र एम एच ११- ५२७१ या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर महिलेला धडक बसली या धडकेत महिलेच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्याने पाय निकामी झाले आहेत. महिलेला धडक दिल्यानंतर टेम्पो भल्या मोठ्या ओढ्यात जाऊन कोसळला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. मदत कार्य करीत त्यांनी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स बोलवून अपघातग्रस्त महिला व टेम्पो ड्रायव्हर यांना पुढील उपचारासाठी सातारा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करत आहेत.
टेम्पो चालकाची चौकशी करण्याची मागणी
देगाव फाट्यावर ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी सेवा रस्त्यावर कमी प्रमाणात गर्दी होती रस्ता मोकळा होता दरम्यान टेम्पो चालक झोपेत की दारुच्या नशेत होता याची चौकशी करण्याची मागणी लगडवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
मोठा अनर्थ टळला
भुईंज ते देगाव पाच किमी अंतर असून देगाव वरून भुईंज मध्ये शाळा, महाविद्यालयीन शिक्षणासाठी, बाजारपेठेत खरेदी, विक्री करण्यासाठी देगाव मधून सर्व ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी रोज येत असतात. दरम्यान घरी जाण्यासाठी सर्वजण देगाव फाट्याचा आधार घेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहनांची प्रतिक्षा करत उभे असतात. दरम्यान या देगाव फाट्यावरच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य झाल्यामुळे नाकाला रुमाल लावून बुक्क्यांचा मार सहन करत नागरिकांना तासनतास त्या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते. दरम्यान आज दुपारची वेळ असल्याने या ठिकाणी तुरळक गर्दी होती. मात्र, मोठी गर्दी असताना या आयशर टेम्पोमुळे एखादी मोठी दुर्घटना घडली असती तर यास जबाबदार कोण? असा प्रश्न देगाव ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



