लोकसंख्या लाखोंच्या घरात | पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा मात्र ब्रिटिशकालीन यंत्रणेच्या भरवशावर

वाहतूक कोंडी, चोऱ्या आणि अवैध धंद्यांमुळे वाईकर हैराण, राजकीय पुढारी मात्र गप्प!

Lo manpower of police, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई शहर आणि तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.  महाबळेश्वर, पांचगणी,धोम धरण आणि महागणपती मंदिर यांमुळे वाई हे पर्यटनाचे मुख्य केंद्र बनले आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येला आणि गर्दीला नियंत्रित करणारी पोलीस यंत्रणा अत्यंत अपुरी आणि हतबल असल्याचे चित्र आहे. त्यातच काल-परवा वाई पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आधीच मनुष्यबळाच्या कमतरतेने ग्रासलेल्या वाई पोलीस ठाण्याची अवस्था आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "वाई पोलीस स्टेशनला आवश्यक असलेला फौजफाटा गृह विभाग कधी उपलब्ध करून देणार?" असा संतप्त सवाल आता वाईकर नागरिकांमधून विचारला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजांच्या काळात वाई पोलीस ठाण्याला ७० अधिकारी व कर्मचारी मंजूर करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, आज शतकानंतरही तीच संख्या कायम आहे. लोकसंख्या लाखोच्या घरात गेली, मात्र पोलीस बळ 'जैसे थे' आहे. त्यातच मंत्री, लोकप्रतिनिधी आणि व्हीआयपी व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी द्यावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाला आहे. पोलिसांचा धाक उरला नसल्याची चर्चा आता तालुक्यात खुलेपणाने सुरू आहे.

गेल्या ४-५ वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील केबल आणि मोटारी चोरीला जाण्याचे सत्र सुरू आहे. पोलिसांनी काही केबल जप्त केल्याचा दावा केला असला, तरी बहुतांश शेतकऱ्यांना त्यांचे साहित्य परत मिळालेले नाही. विशेष म्हणजे, चोरीचा माल खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर किंवा संबंधित खरेदीदारांवर ठोस कायदेशीर कारवाई का होत नाही? हा खरा प्रश्न आहे. जर खरेदीदारांवर कठोर कारवाई झाली असती, तर चोऱ्यांना आळा बसला असता, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाई शहरातील मध्यवर्ती लोकवस्तीत असलेल्या गंगापुरी येथील जबरी चोरीचा तपास अद्यापही गुलदस्त्यात आहे. अनेक घरफोड्यांचे गुन्हे नुसते नोंदवून झाले आहेत, पण त्यांचा तपास का लागत नाही? अनेक अवैध धंद्यांवर छापेमारी केल्याचा दावा पोलीस करतात, मात्र पत्रकारांनी वारंवार मागणी केल्याशिवाय अधिकृत प्रेस नोट का दिली जात नाही? गुन्हे आणि कारवाया लपवण्यामागे काय हेतू आहे? गुन्हेगारांशी काही कर्मचाऱ्यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळेच तर त्यांना अभय मिळत नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. वाई पोलीस ठाण्याला आता एखाद्या 'खमक्या' आणि कडक अधिकाऱ्याची गरज आहे, जो कर्मचाऱ्यांवर वचक ठेवून ठाण्याची मलिन झालेली प्रतिमा सुधारू शकेल.

शहरातील वाहतूक समस्येबाबत अनेक वर्षांपासून फक्त बैठका, आराखडे आणि घोषणांचा खेळ सुरू आहे. वाढते अतिक्रमण, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अल्पवयीन मुले सर्रास गाड्या चालवत आहेत, कुठेही पार्किंग केली जात आहे. नगरपालिका प्रशासन आणि पोलीस दोघांनीही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात वाईत दुचाकी घेऊन फिरणेही अवघड होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यात अनेक धडक कारवाया केल्या आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल जनतेत आदर आहे. त्यामुळे आता वाई तालुक्यातील पोलिसांची कमतरता भरून काढण्यासाठी, 'क्राईम रेट' कमी करण्यासाठी आणि वाईला न्याय देण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण वाईकरांचे लक्ष लागले आहे.

वाई शहराच्या या गंभीर परिस्थितीवर तालुक्यातील एकही राजकीय नेता किंवा पुढारी चकार शब्द काढायला तयार नाही. निवडणुकांपुरते मत मागायला येणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या प्रश्नावर गप्प का? वाई तालुक्याला न्याय कधी मिळणार? प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वाईकरांच्या सुरक्षेसाठी कधी जागे होणार? हा प्रश्न आता पेटून उठला असून, जर हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात वाई शहराची अवस्था अत्यंत बिकट होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !