३ लाख २५ हजारांची विदेशी दारू जप्त - मौजे पुळूज येथे पोलिसांची धडाकेबाज छापा - एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले
आगामी आषाढी वारी आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे पुळूज येथे छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३ लाख २५ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सव्वातीन लाखाचा अवैध दारू साठा जप्त
आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर परिसरात कडक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात येत आहे. मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजे पुळूज या गावी छापा टाकला. येथील रहिवासी आरोपी अन्सार शेख (वय ५० वर्षे) याच्या घराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बेकायदेशीररी्या साठवून ठेवलेला विदेशी दारूचा साठा पोलिसांना आढळून आला.
या धडक कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे (उदा. रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, रोमॅनो) एकूण २५ दारूचे बॉक्स जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण विदेशी दारूची बाजारातील एकूण किंमत ३ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. आरोपी अन्सार शेख याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
उत्पादन शुल्क विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत
विशेष म्हणजे पंढरपूर तालुका आणि परिसरात उत्पादन शुल्क विभागाची स्वतंत्र शाखा आहे. त्यामुळे या परिसरातील अवैध बेकायदेशीर दारू विक्रीवर नियंत्रण ठेवणे हे उत्पादन शुल्क विभागाचे काम आहे. मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कुंभार हे अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात कमी पडत आहेत अशी चर्चा आता परिसरात होत आहे. पंढरपूर ही आध्यात्मिक नगरी असल्यामुळे येथे सात्विक वातावरण असावे अशी वारकऱ्यांची अपेक्षा असते मात्र पंढरपूर शहर आणि परिसरात अनेक धाब्यांवर हॉटेलवर आणि आडोसा पाहून शेड मारून अवैध, बेकायदेशीर, आणि गावठी दारू विक्री सुरू आहे. अगदी लहान मुलांना देखील दारू कुठे मिळते हे माहीत आहे मात्र उत्पादन शुल्क विभागाला ते सापडत नाही. हे एक कोडेच आहे. जर पोलीस आपल्या अधिकारात अवैध दारूचा एवढा मोठा साठा जप्त करत असतील तर उत्पादन शुल्क विभाग अशा आरोपींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करतो का असा देखील सवाल आता उपस्थित होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
सदरची धडाकेबाज कामगिरी सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कवाडे साहेब आणि माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे साहेब यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अवैध धंदेवाल्यांना पोलिसांचा कडक इशारा
या कारवाईत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पीएसआय भारत भोसले, निलेश गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक भोसले, मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, संतोष चव्हाण, विजयकुमार आवटी आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे, हासन नदाफ यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. वारीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील, असा कडक इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



