सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची बाजी - धैर्यशील कदम यांचा दणदणीत विजय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव

Maharashtra Legislative Council election, Dhairyashil Kadam victorious, Abhaysinh Jagtap defeated, MLC election,sangali, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजपचे धैर्यशील कदम विजयी होत आमदार झाले. पण या विजयामागची पार्श्वभूमी समजून घेतली, तर ही केवळ एक निवडणूक नव्हे, तर गेल्या काही वर्षांच्या राजकीय घडामोडींचा परिपाक असल्याचे स्पष्ट दिसते.

जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया.

कराड उत्तरची निवडणूक आठवा. त्या वेळी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही भाजपमधील दावेदार होते. त्या निवडणुकीत धैर्यशील कदम यांनी माघार घेतली आणि मनोज घोरपडे आमदार झाले. मात्र, पुढे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत हेच दोघे वेगवेगळे लढले; पण त्या लढतीत दोघांच्याही हाती काही ठोस लागले नाही.

आता पुन्हा वळूया सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीकडे...

तिकीट वाटपाच्या वेळी मागील राजकीय घडामोडी, पक्षनिष्ठा, संयम आणि संघटनात्मक गणित या सगळ्यांचा विचार झाला असावा आणि त्यामुळेच धैर्यशील कदम यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या प्रचाराची सुरुवात दमदार झाली आणि शेवटही तितकाच भक्कम झाला.

महायुतीच्या रूपाने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि शिवसेना यांनी एकत्र येत धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या विजयाची वाट मोठ्या प्रमाणात सुकर झाली होती. आज निकाल लागला आणि ते आमदार म्हणून निवडून आले.

या विजयामागे मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह महायुतीतील सर्वच नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे मानले जात आहे. महायुतीने संघटित ताकद दाखवत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आणि अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनीही चांगला प्रयत्न केला. सांगली जिल्ह्यातून त्यांना भक्कम पाठिंबा मिळाला, मात्र साताऱ्यात ज्या मतांवर आणि ज्या राजकीय समीकरणांवर ते विसंबून होते, त्याच ठिकाणी त्यांची निराशा झाली. महायुतीत नाराज असलेल्या काही मतांचा फायदा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती; पण प्रत्यक्ष निकालात ते गणित फारसे जुळून आले नाही. उलट, महाविकास आघाडीकडून अपेक्षित तितकी ‘रसद’ आणि एकजूट मिळाली नाही, हीच त्यांच्या पराभवामागची मोठी खंत ठरली.

एकूणच, अभयसिंह जगताप यांना सांगलीत साथ मिळाली; पण साताऱ्यात अपेक्षाभंग झाला आणि धैर्यशील कदम यांनी संपूर्ण निवडणुकीत आपली आघाडी कायम राखत विजय संपादन केला.

धैर्यशील कदम यांच्या विजयाची घोषणा होताच सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलाल उधळत, फटाके फोडत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. माण-खटावसह दोन्ही जिल्ह्यांत अक्षरशः दिवाळी साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली 

धैर्यशील कदम यांनी संयम, पक्षनिष्ठा आणि संघटनशक्तीच्या जोरावर अखेर आमदारकीची शर्यत जिंकली; तर अभयसिंह जगताप यांचे गणित मात्र साताऱ्यात कोलमडले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !