जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रम
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी कृषी प्रक्रिया उद्योगांना अधिक बळ देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कॉफी विथ कलेक्टर’ उपक्रमात त्यांनी कृषी उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), पीएमएफएमई लाभार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
या बैठकीत कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धित उत्पादने, बाजारपेठ उपलब्धता, ब्रँडिंग आणि निर्यात यासंदर्भातील अडचणी तसेच संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबाबतही विचारविनिमय झाला.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी आणि ब्लूबेरी या बेरी पिकांचा राज्य फलोत्पादन विकास कार्यक्रमात समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उद्योग, प्रभावी ब्रँडिंग आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासह सातारा जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या वाढीमुळे रोजगारनिर्मिती आणि स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



