६०० मीटरचा प्रलंबित रस्ता अखेर खुला!
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील एकसर गावामध्ये प्रशासकीय समन्वय आणि भक्कम लोकसहभागाच्या जोरावर 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता' योजनेअंतर्गत एका महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
बुवासाहेब मंदिर रस्ता ते आनंदा लडकत यांच्या शेतापर्यंतचा हा जवळपास ६०० मीटर लांब आणि ३ मीटर रुंद रस्ता अत्यंत दुर्गम स्थितीत होता. हा रस्ता तयार करताना शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. रस्त्याच्या मार्गात येणाऱ्या ओढे व नाल्यांच्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकून वरून भक्कम रस्ता तयार करण्यात आला. यासाठी लागणारी सर्व मशिनरी आणि यंत्रणा शेतकऱ्यांनी स्वतःचा खर्च करून उभी केली.
या रस्त्याची अडचण दूर करण्यासाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांची भेट घेतली होती. गायकवाड यांनी तातडीने हालचाली करत तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या माध्यमातून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. प्रशासनाच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि सूचनेप्रमाणे या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याला एकसर गावच्या विद्यमान सरपंच सुमन मालुसरे, शरद घाडगे, हनुमंत पवार, आनंद तरडे, विष्णू लडकत व परिवार, संतोष तात्या गायकवाड, महेश घाडगे, रुपेश पार्टे आदी मान्यवरांसह एकसर गावचे ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यामुळे आता शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात नेणे आणि दैनंदिन दळणवळण करणे अत्यंत सोपे होणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



