वाईकरांच्या भावनांशी खेळ थांबवा - शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा अखेर केव्हा उभारणार?
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचा गौरव लाभला आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामाशी असलेली जवळीक, इतिहासाची साक्ष देणारे घाट, वाडे, मंदिरे आणि वेशी यांमुळे वाईचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाले आहे. मात्र एवढा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा नसल्याची खंत वाईकरांच्या मनात कायम आहे. गेली वीस वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत होत असलेली दिरंगाई मुळे वाईकर नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सन २००४ पासून शहरातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळा केवळ आश्वासनांच्या गर्तेत अडकला असून प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. राज्याचे पणन व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी अनेक निवडणुकात या पुतळ्याविषयी वाई विधानसभा मतदार संघातील मतदारांना निवडणुकीत आश्वासने दिली होती. परंतु पुतळ्याचे काम आज मितीला पूर्ण झालेले नाही. पुतळ्यासाठी चबुतरा उभारण्यात काम सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्ष पुतळा कधी उभारला जाणार याचे उत्तर आजही अनुत्तरित आहे.
दरवेळी राजकीय नेत्यांकडून "सहा महिन्यांत पुतळा उभा राहील", "दोन वर्षांत काम पूर्ण होईल", "लवकरच उद्घाटन होणार" अशी आश्वासने दिली गेली. मात्र वर्षानुवर्षे उलटून गेली तरी शिवप्रेमींच्या भावना पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता वाईकर जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगराध्यक्षांनी सुध्दा आपल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तीन महिन्यात पुतळा उभारणार असल्याचे आश्वासित केले होते. परंतु मूर्ती कारांकडून दिरंगाई होत असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे.
"इतिहासाचा अभिमान मिरवणाऱ्या वाईमध्ये शिवरायांचा अश्वारूढ पुतळा नसावा यासारखे दुसरे दुर्दैव ते कोणते. वाईतील अनेक संघटनांनी या पुतळ्यासाठी आंदोलने केली आहेत. दरवेळी त्यांना आश्वासने देवूनच प्रशासनाने तोंडावरून हात फिरविला आहे. परंतु गेली वीस वर्षे हा प्रश्न उनुत्तरीत आहे.
शिवरायांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारे प्रेरणास्थान म्हणून हा पुतळा उभारला जाणे आवश्यक असल्याचे मत शिवप्रेमींनी व्यक्त केले आहे.
वाई शहराच्या ऐतिहासिक ओळखीला साजेसा आणि शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासनाने यापुढे केवळ आश्वासने न देता तातडीने निर्णय घेऊन पुतळा उभारणीचे काम पूर्ण करावे, अशी एकमुखी मागणी वाईकर जनतेतून होत आहे.
वाईकरांचे स्वप्न अखेर केव्हा पूर्ण होणार?
शिवप्रेमींच्या भावनांचा आदर राखत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तात्काळ उभारण्याची वेळ आता आली आहे, अशी तीव्र भावना वाई तालुक्यासह संपूर्ण शहरातून व्यक्त होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांनी या लोक भावनेचा आदर करून हा प्रलंबित प्रश्न त्वरित पूर्ण करावा अशी मागणी होत आहे. वाईकरांचे स्वप्न पूर्ण केव्हा होणार
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



