एअर मार्शल हेमंत भागवत यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई वसंत व्याख्यानमालेत “विश्वगुरू भारत आणि विश्वयुद्ध” या विषयावर एअर मार्शल हेमंत भागवत यांचे परखड आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मकरंद शेंडे होते.
एअर मार्शल हेमंत भागवत म्हणाले “संरक्षण या विषयाकडे युवकांनी वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ब्रिटिशांनी केवळ ‘डिव्हाईड अँड रूल’मुळे जगावर राज्य केले असे नाही; तर त्यांच्या समाजात सैनिक आणि सुरक्षादलांविषयी असलेला आदर ही त्यामागील मोठी शक्ती होती. ज्या राष्ट्राच्या नेतृत्वामध्ये सैनिकांविषयी सन्मान असतो, त्या राष्ट्राची संरक्षणव्यवस्था मजबूत राहते.
युक्रेनने १९९५ मध्ये अण्वस्त्रे सोडण्याचा निर्णय घेतला; पण आज त्याच निर्णयाचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. भविष्याचा विचार करून वर्तमानातील निर्णय घ्यावे लागतात. दुसरीकडे इस्रायल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मजबूत उभा आहे, कारण त्यांची संरक्षणव्यवस्था सक्षम आहे. युद्ध हे केवळ सामरिक किंवा आर्थिक नसून सांस्कृतिक पातळीवरही चालते. प्रत्येक समाजाची काही शाश्वत मूल्ये असतात. ती वाचवण्यासाठी सज्ज राहावे लागते.
भारताने गेल्या हजारो वर्षांत कुणावर प्रथम आक्रमण केले नाही, ही आपली परंपरा असली तरी जग त्याच तत्त्वावर चालत नाही. गेल्या ७८ वर्षांत भारतावर अनेक युद्धे लादली गेली. त्यामुळे संरक्षण सज्जता ही अपरिहार्य आहे. बाराव्या-तेराव्या शतकात भारत जगातील सर्वाधिक समृद्ध राष्ट्रांपैकी एक होता; मात्र संरक्षणाच्या बाबतीत उदासीनता वाढल्याने देश पारतंत्र्यात गेला. समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचला की संरक्षण दुय्यम मानण्याची चूक करतो आणि बाह्य आक्रमक त्याच क्षणाची वाट पाहत असतात. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय सभ्यतेच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःची मानणारे अपवादात्मक राज्यकर्ते होते.
पाकिस्तान आणि चीन या दोन वेगळ्या आव्हानांकडे भारताने वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. पाकिस्तानकडून सलोख्याची अपेक्षा ठेवणे वास्तववादी नाही. भारताने आपल्या आर्थिक आणि सामाजिक शक्तीची जाणीव पाकिस्तानला करून दिली पाहिजे. मात्र चीनबाबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणे भारतासाठी हिताचे नाही. चीनची खरी स्पर्धा अमेरिकेशी आहे. भारत आणि चीन या दोन प्राचीन सभ्यतांनी संघर्षाऐवजी संतुलित संबंध ठेवणे आवश्यक आहे.
भारताने संरक्षणावरील खर्च वाढवणे अत्यावश्यक आहे. चीन आणि अमेरिका सैन्यावर प्रचंड खर्च करतात, तर भारताचा खर्च तुलनेने खूपच कमी आहे. किमान तीन टक्के राष्ट्रीय अर्थसंकल्प संरक्षणासाठी सातत्याने राखला गेला पाहिजे. शस्त्रास्त्रनिर्मितीत आत्मनिर्भरता ही काळाची गरज आहे. फायटर विमानांची कमतरता, परदेशी पुरवठ्यावर अवलंबित्व आणि उशिरा होणाऱ्या पुरवठ्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होतो. चीनने १९९१ नंतर संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण केले आणि आज ती मोठी सैनिकी शक्ती बनली आहे. भारतानेही तंत्रज्ञान, गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण उत्पादन क्षेत्र मजबूत केले पाहिजे.
सियाचीनसारख्या मोहिमांमध्ये गुप्तचर यंत्रणेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. युद्धात लहान वाटणाऱ्या चुका मोठे नुकसान घडवू शकतात. ‘ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स’ हे धोरण लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्राने आपल्या विद्वान आणि सैनिक या दोघांनाही समान सन्मान दिला पाहिजे; अन्यथा विचार भित्रे लोक करतील आणि लढाया मूर्ख लोक लढतील,” असे ते म्हणाले.
प्रास्ताविक विठ्ठल माने यांनी केले.प्रमुख वक्त्यांचा परिचय व आभार डॉ. रूपाली अभ्यंकर यांनी मानले . प्रायोजक श्रीमती विजया वसंत शेंडे आणि श्री चेतन धारिया यांचा सत्कार एअर मार्शल भागवत यांनी केला .व्याख्यानातून उपस्थितांना राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण धोरणज्ञ आणि जागतिक सामरिक वास्तव यांचा व्यापक दृष्टिकोन मिळाला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



